चालू घडामोडी : १३ एप्रिल २०२१
मार्चमध्ये महागाई दर ५.५२ टक्क्यांवर
वाढत्या अन्नधान्याच्या किमती तसेच इंधनाचे दर यामुळे सरलेल्या मार्च महिन्यात किरकोळ ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर ५.५२ टक्के नोंदला गेला आहे.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाद्वारे जाहीर होणारा हा दर महिन्यापूर्वी, फेब्रुवारी २०२१ मध्ये ५.०३ टक्के होता.
एकूण किरकोळ ग्राहक किंमत निर्देशांकातील प्रमुख अन्नधान्याच्या किमतीचा निर्देशांक यंदाच्या मार्चमध्ये ४.९४ टक्के नोंदला गेला आहे. आधीच्या महिन्यात तो तुलनेने कमी, ३.८७ टक्के होता, तर इंधन व ऊर्जा गटातील वस्तूंच्या किमती एक टक्क्याने झेपावल्या आहेत. फेब्रुवारीमधील ३.५३ टक्क्यांच्या तुलनेत त्या गेल्या महिन्यात ४.५० टक्के झाल्या आहेत.
वाढत्या महागाईबाबत चिंता व्यक्त करत रिझव्र्ह बँकेने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्याच द्वैमासिक पतधोरणात प्रमुख व्याज दर स्थिर ठेवण्याचे धोरण गेल्याच आठवड्यात जाहीर केले होते.
वित्त वर्ष २०२०-२१ मधील जून ते नोव्हेंबर असे सलग सहा महिने महागाई दर सहनशील अशा ६ टक्क्यांवर राहिल्यानंतर डिसेंबर व जानेवारीमध्ये तो खाली आला होता. मात्र पुढच्याच महिन्यात तो ५ टक्क्यांवर पोहोचला.
आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचा “वैश्विक वेतन अहवाल 2020-21
आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने “वैश्विक वेतन अहवाल 2020-21: कोविडकाळातील वेतन व किमान वेतन” या शीर्षकाखाली त्याचा वार्षिक अहवाल प्रकाशित केला आहे.
भारतातील श्रमिकांचे सरासरी वेतनमान कमी व कामाचे तास जास्त असणे, आशिया व पॅसिफिक विभागातील सर्व प्रदेशांमध्ये श्रमिकांच्या वेतनमानात 2006-19 या कालखंडात झालेली लक्षणीय वाढ, या बाबतीत इतर राष्ट्रांसोबत भारतानेही आघाडी घेतलेली आहे.
सरासरी वेतनाची तुलना करताना, अहवालात लक्षात घेतलेला राष्ट्रीय पातळीवरील किमान वेतनदर, प्रतिदिन 176 रुपये एवढा आहे. परंतु प्रत्यक्ष वेतन याहून खूप जास्त आहे.विविध राज्यातील किमान वेतनाचा मध्य बघितला तर देशातील किमान वेतनदर प्रतिदिन 269 रुपये निश्चित करता येतो.
8 ऑगस्ट 2019 रोजी जाहीर झालेली ‘वेतन संहिता 2019’ देशात सर्वत्र लागू झाली असून त्यानुसार संघटित आणि असंघटीत क्षेत्रातले सर्व कामगारांना किमान वेतनाचा हक्क देण्यात आला आहे. वैधानिक प्रत्यक्ष वेतन या नवीन संकल्पनेला नवीन वेतन संहितेत स्थान मिळाले आहे.
किमान वेतनाचा सातत्याने आढावा घेतला जाणे आणि पाच वर्षांपर्यंतच्या ठराविक नियमित कालावधीनंतर तत्कालीन सरकारांनी त्यात सुधारणा कराव्यात असेही वेतन संहितेत नमूद आहे.
ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांना २०२० चा सरस्वती सन्मान पुरस्कार
मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांना २०२० या वर्षीचा सरस्वती सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या ‘सनातन’ या कादंबरीला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. १५ लाख रुपये, प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचे स्वरूप आहे.
दिल्लीच्या के. के. बिर्ला फाउंडेशनकडून हा पुरस्कार दिला जातो. देशातल्या २२ भाषांमधील पुस्तकांचे अवलोकन करून दरवर्षी एका लेखकाला हा पुरस्कार दिला जातो. याआधी १९९३ मध्ये विजय तेंडुलकर व २००२ मध्ये महेश एलकुंचवार यांना हा पुरस्कार मिळाला होता.
१९९१ मध्ये केके बिर्ला फाउंडेशनच्यावतीने सुरू केलेला सरस्वती सन्मान पुरस्कार देशातील प्रतिष्ठित व सर्वोच्च साहित्यिक पुरस्कारांपैकी एक म्हणून ओळखला जातो.
शरणकुमार लिंबाळे यांची ४० पेक्षा अधिक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. तसेच, अक्करमाशी हे आत्मचरित्र देखील प्रसिद्ध आहे. १९८६ ते १९९२ या कालावधीत ते सोलापूरच्या आकाशवाणी केंद्रावर उद्घोषक म्हणून कार्यरत होते त्यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून ते सेवानिवृत्त झाले.