Current Affairs 14 April 2020
करोनावर नियंत्रण मिळवणारे केरळ देशातील पहिले राज्य
देशात करोना व्हायरसचा पहिला रुग्ण केरळमध्ये सापडला होता. पण त्याच केरळमध्ये आता करोना बाधित रुग्णांची संख्या मोठया प्रमाणावर कमी झाली आहे. देशातील अन्य राज्यांमध्ये करोनाग्रस्तांची संख्या रोज वाढतेय पण केरळमध्ये आता करोनाचे रुग्ण सापडण्याचे प्रमाण अवघे तीन ते चार आहे.
केरळने सर्वप्रथम करोना चाचण्यांचा वेग वाढवून करोनाची लागण झालेल्या रुग्णांची ओळख पटवली. त्यानंतर रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना शोधून काढले व सक्तीचा २८ दिवसांचा क्वारंटाइन पीरीयड, याची प्रभावी अंमलबजावणी केली. जागतिक आरोग्य संघटनेचा क्वारंटाइनसाठी जो कालावधी आहे. त्यापेक्षा दुप्प्ट दिवसांचा क्वारंटाइन पीरीयड ठेवला. महत्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व मजबूत सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमुळे शक्य झाले.
३० जानेवारीला केरळमध्ये करोना व्हायरसचा एक रुग्ण होता. १३ एप्रिलला ही संख्या ३७८ आहे. दोन जणांचा मृत्यू झाला आहे. १९८ करोनाग्रस्त पूर्णपणे बरे झाले आहेत. २७ मार्चला केरळमध्ये करोनाचे सर्वाधिक ३९ रुग्ण आढळले. १२ एप्रिलला म्हणजे दोन दिवसांपूर्वी संपूर्ण राज्यात अवघे दोन करोनाग्रस्त आढळले. १८ जानेवारीला केरळच्या आरोग्य मंत्रालयाने Covid-19 चा अलर्ट जाहीर केला व परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी सुरु केली.
भारतात लॉकडाऊनच्या कालावधीत ३ मेपर्यंत वाढ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनचा आजचा अखेरचा दिवस आहे. या दिवशी देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी देशव्यापी लॉकडाऊन ३ मेपर्यंत कायम राहणार असल्याचं जाहीर केलंय.
करोना हॉटस्पॉट वाढले नाही तर नियम शिथील करण्यात येतील, असा दिलासाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना दिलाय. २० एप्रिलपर्यंत प्रत्येक प्रदेशाचं मूल्यांकन केलं जाणार आहे. जे प्रदेश करोनावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी होतील तिथले नियम शिथील केले जातील, असंही त्यांनी म्हटलंय.
किरकोळ महागाई दरमार्चमध्ये ५.९१ टक्के
खाद्यपदार्थांच्या किंमती कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात किरकोळ महागाईचा दर फेब्रुवारीच्या तुलनेत घटून ५.९१ टक्क्यांवर पोहोचला आहे. केंद्रीय सांख्यिकी आयोगाने सोमवारी ही आकडेवारी जाहीर केली. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित (सीपीआय) महागाईचा दर फेब्रुवारी महिन्यात ६.५८ टक्क्यांवर होता. हाच दर मार्च २०१९मध्ये २.८६ टक्क्यांवर होता.
केंद्रीय सांख्यिकी आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार मार्च २०२०मध्ये खाद्यपदार्थांच्या चलनवाढीचा दर ८.७६ टक्के राहिला; जो गेल्या महिन्याच्या तुलनेत (१०.८१टक्के) कमी आहे. अन्नधान्य आणि अन्य उत्पादनांच्या महागाई दरात मार्चमध्ये किरकोळ वाढ झाली असून, फेब्रुवारीच्या (५.२३ टक्के) तुलनेत किरकोळीने वाढून ५.३० टक्क्यांवर राहिली. इंधन आणि वीजदराची महागाई विचारात घेता मार्चमध्ये ती ६.५९ टक्क्यांवर राहिली. फेब्रुवारीमध्ये हाच दर ६.३६ टक्के होता. रिझर्व्ह बँकेतर्फे पतधोरणाचा आढावा घेताना किरकोळ महागाईचा दर लक्षात घेतला जातो. केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेनला महागाईचा दर ४ टक्क्यांच्या आसपास ठेवण्याविषयी बजावले आहे.