⁠  ⁠

चालू घडामोडी – १५ जून २०१६

Tushar Bhambare
By Tushar Bhambare 5 Min Read
5 Min Read

देश-विदेश

दहा नक्षलग्रस्त राज्यांमध्ये ३५० पोलिस ठाणी सुरू करणार
# देशातील दहा नक्षलग्रस्त राज्यांमध्ये ३५० पोलिस ठाणी सुरू करण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला असून, त्यातील दहा पोलिस ठाणी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्य़ात सुरू केली जाणार आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत देशातील काही राज्यांमध्ये नक्षलवाद्यांच्या हिंसक घटनांमध्ये कमालीची वाढ झालेली आहे. छत्तीसगड, ओदिशा व झारखंड या तीन राज्यांत तर या घटना सातत्याने घडताना दिसत आहेत. महाराष्ट्रही यात आघाडीवर आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी देशातील दहा नक्षलग्रस्त राज्यांमध्ये ३५० पोलिस ठाणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्नही सुरू केले असल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृह मंत्रालयाने नक्षलग्रस्त राज्यांकडून तशी माहिती मागविली आहे. देशात छत्तीसगड, ओदिशा, झारखंड, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार व पश्चिम बंगाल या नक्षलवादग्रस्त दहा राज्याच्या रेड कॅरिडॉरमध्येच ही ३५० पोलिस ठाणी राहणार आहेत. ही सर्व पोलिस ठाणी आधुनिक पध्दतीची असतील. तेथे सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

निर्धूर चूल योजनेला राज्यात लाल कंदील
# केंद्र सरकारच्या नवीन व नूतनीकरण ऊर्जा मंत्रालयाने निर्धूर चूल योजना (उन्नत चुल्हा अभियान) सुरू करून दोन वष्रे उलटली तरी या योजनेच्या अंमलबजावणीला राज्यात मुहूर्त सापडलेला नाही. ग्रामीण भागातील महिलांना स्वयंपाक करताना येणाऱ्या अडचणी दूर करणाऱ्या आणि प्रदूषण कमी करणाऱ्या या योजनेकडे यंत्रणांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
नवीन व नूतनीकरण ऊर्जा मंत्रालयाने २७ जून २०१४ पासून निर्धूर चूल योजना (उन्नत चुल्हा अभियान) सुरू केली. महिलांच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या या योजनेत वायू प्रदूषण कमी करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. या योजनेसाठी राज्यात उद्दिष्टही निर्धारित करण्यात आले आहे. निर्धूर चूल योजनेची कार्यवाही इंदिरा आवास योजनेअंतर्गत कार्यवाहीशी सुसंगत करावी, असे केंद्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने ४ सप्टेंबर २०१४ रोजीच्या पत्रान्वये सरकारने कळवले, पण राज्यातील यंत्रणांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

हवाई वाहतुकीच्या नव्या धोरणाला कॅबिनेटची मंजुरी
# केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंगळवारी नागरी हवाई वाहतुकीच्या नव्या धोरणाला मंजुरी देण्यात आली. या नव्या धोरणानुसार हवाई प्रवासाचे दर कमी होण्याची शक्यता असून प्रवाशांना अनेक सुविधांचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून ३ जून रोजी हे धोरण केंद्रीय मंत्रिमंडळाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते. नोव्हेंबर २०१४ मध्ये रालोआ सरकारकडून पहिल्यांदा या धोरणाचा मसुदा तयार करण्यात आला होता. त्यानंतर ऑक्टोबर २०१५ मध्ये धोरणाचा सुधारित मसुदा तयार करण्यात आला होता. मात्र, काही नियमांमुळे या धोरणाला मंजुरी मिळण्यात अडचण येत होती.

दोन ताऱ्यांभोवती फिरणाऱ्या गुरूसारख्या महाकाय ग्रहाचा शोध
# नासाच्या केप्लर अवकाश दुर्बिणीने दोन ताऱ्यांभोवती फिरणारा गुरूसारखा ग्रह शोधला असून तो आतापर्यंत शोधण्यात आलेला विश्वातील सर्वात मोठा खगोलीय घटक असल्याचा दावा करण्यात आला आहे. केप्लर १६४७ बी असे या ग्रहाचे नाव असून तो हंस तारकासमूहात आहे. त्याचा शोध नासाच्या गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटर व सॅनडियागो स्टेट युनिव्हर्सिटीच्या खगोलशास्त्रज्ञांनी लावला आहे. केप्लर १६४७ हा ग्रह ३७०० प्रकाशवर्षे दूर असून तो ४.४ अब्ज वर्षे जुना आहे. तो वयाने पृथ्वीइतकाच आहे असे संशोधकांनी म्हटले आहे. तो ज्या ताऱ्यांभोवती फिरत आहे ते सूर्यासारखेच असून त्यातील एक सूर्यापेक्षा मोठा तर एक सूर्यापेक्षा लहान आहे. या ग्रहाचे वस्तुमान व त्रिज्या गुरूइतकी असून तो दोन ताऱ्यांभोवती सापडलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा ग्रह असल्याचा दावा करण्यात आला. जे ग्रह दोन ताऱ्यांभोवती फिरतात त्यांना सरकमबायनरी असे म्हटले जाते.जे ग्रह दोन ताऱ्यांभोवती फिरतात त्यांना सरकमबायनरी असे म्हटले जाते.

भारताला एका वर्षांत ‘एससीओ’चे संपूर्ण सदस्यत्व मिळणार
# भारताला एका वर्षांत शांघाय सहकार्य संघटनेचे (एससीओ) संपूर्ण सदस्यत्व मिळण्याची शक्यता आहे, असे चीन आणि रशियाच्या नेतृत्वाखालील सहासदस्यीय राजकीय, आर्थिक आणि लष्करी आघाडीच्या सरचिटणीसांनी म्हटले आहे. गेल्या जवळपास वर्षभरापासून भारताच्या उच्चपदस्थ प्रतिनिधींशी याबाबत चर्चा सुरू आहे, संपूर्ण सदस्यत्व मिळण्यासाठी अर्जदार देशाला या देशातील पद्धतीनुसार सर्व दस्तऐवज स्वीकारणे गरजेचे आहे, असे सरचिटणीस रशीद आलिमोव्ह यांनी सोमवारी येथील एससीओ मुख्यालयात स्पष्ट केले. ताश्कंद येथे २३ आणि २४ जून रोजी होणाऱ्या परिषदेत भारत एससीओ सदस्यत्व मिळण्याच्या संदर्भात आणखी एक पाऊल पुढे टाकणार आहे. अर्जदार देशांच्या बांधिलकीबाबतच्या करारावर भारत स्वाक्षरी करणार आहे. या प्रकारचे जवळपास ३० दस्तऐवज आहेत, मुख्य दस्तऐवज हा दीर्घ मुदतीच्या भागीदारीबाबतचा, सहकार्यबाबतचा आणि उत्तम शेजारधर्माबाबतचा आहे.

TAGGED:
Share This Article