मे महिन्यात घाऊक महागाईच्या दराने गाठला उच्चांक
देशामधील घाऊक बाजरपेठेतील महागाईचा विस्फोट झाल्याचं चित्र दिसत आहे. एप्रिल महिन्यामध्ये १०.४९ टक्क्यांवर असणारा घाऊक महागाईचा दर मे महिन्यात थेट १२.९४ टक्क्यांवर पोहचल्याची माहिती सरकारी आकडेवारीमधून समोर आली आहे.
मे महिन्यामध्ये महागाईच्या दरामध्ये २.४५ टक्क्यांनी वाढ झालीय. यापूर्वी मार्च महिन्यामध्ये हा दर ७.३९ टक्के इतका होता. महागाई वाढल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे.
मार्च महिन्यात महागाई दर ७.३९ टक्के इतका होता. तर एप्रिलमध्ये हा महागाई दर १०.४९ टक्क्यांवर पोहोचला तर आता मे महिन्याच्या आकडेवारीमध्ये महागाईच्या दराने जवळजवळ १३ टक्क्यांचा आकडा गाठल्याचं चित्र दिसत आहे.
महागाई दरात एका महिन्यात जवळपास २.४५ टक्क्यांनी वाढ झाली असून यापूर्वी ही वाढ ३.१ टक्क्यांची होती.
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार फेब्रुवारीत महागाई दर ४.८३ टक्के इतका होता. त्यानंतर मार्च महिन्यात महागाई दर २.५६ टक्क्यांनी वाढला आणि ७.३९ टक्क्यांवर पोहोचला. नंतर एप्रिलमध्ये तो १०.४९ टक्क्यांवर पोहोचला.
भारताकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार
ऑनलाइन व ऑफलाइन अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या जी ७ देश व अतिथी देशांच्या निवेदनावर भारताने स्वाक्षरी केली आहे.
ऑनलाइन व ऑफलाइन स्वातंत्र्यामुळे लोकशाहीचे रक्षण होत असते तसचे लोकांना भय व दडपशाहीपासून मुक्तता मिळत असते, असे या निवेदनात म्हटले आहे.
जी ७ देशांनी सादर केलेल्या चीन विरोधातील मानवी हक्क व मूलभूत स्वातंत्र्ये या निवेदनावर भारताने व निमंत्रित देशांनी स्वाक्षरी केली नाही.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी या निवेदनावर स्वाक्षरी करणाऱ्या देशांना डेमोक्रसीज ११ असे नाव दिले आहे.
विनू मांकड,संगकारा यांना ICC Hall Of Fame मध्ये स्थान
टीम इंडियाचा महान क्रिकेटर विनू मांकड, श्रीलंकेचा माजी फलंदाज कुमार संगकारा आणि झिम्बाब्वेचा माजी कर्णधार अँडी फ्लॉवर यांच्यासह दहा दिग्गजांना आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये (ICC Hall Of Fame) स्थान देण्यात आले आहे.
भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल विनू मांकड यांना ICC ने सर्वोत्तम क्रिकेटपटूंच्या यादीत स्थान दिले आहे.
मांकडने ४४ कसोटी सामने खेळले. यात मानकडने ३१.४७ च्या सरासरीने २,१०९ धावा केल्या. तर ४४ कसोटी सामन्यांमध्ये ३२.३२ च्या सरासरीने १६२ बळी घेतले. मांकडची गणना भारताच्या महान अष्टपैलू खेळाडूंमध्ये केली जाते.
श्रीलंकेकडून संगकाराने १४४ कसोटी सामने खेळले असून त्यामध्ये त्याने ५७.४० च्या सरासरीने १२,४०० धावा केल्या. या मध्ये त्याने ३८ शतके आणि ५२ अर्धशतके केली आहेत. याशिवाय त्याने १८२ कॅच घेतले आणि २० स्टंपिंग्स केले. संगकाराच्या नेतृत्वात श्रीलंकेने २०११ च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला होता, जरी त्या संघाला भारताकडून पराभवाला सामोरे जावे लागले. संगकारा एक उत्तम फलंदाज तसेच एक महान यष्टीरक्षक होता.
नोव्हाक जोकोव्हिचने फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले
नोव्हाक जोकोव्हिचने ग्रीसच्या पाचव्या मानांकित स्टेफानोस त्सित्सिपासचे आव्हान पाच सेटमध्ये परतवून लावत फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले.
जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या जोकोव्हिचने अंतिम फेरीत जोमाने मुसंडी मारत त्सित्सिपासवर ६-७ (६/८), २-६, ६-३, ६-२, ६-४ अशी बाजी मारली.
जोकोव्हिचचे हे फ्रेंच खुल्या स्पर्धेचे दुसरे तर कारकीर्दीतील एकूण १९वे ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले.
सर्वाधिक २० ग्रँडस्लॅम जेतेपदे मिळवणाऱ्या राफेल नदाल आणि रॉजर फेडरर यांच्यापेक्षा तो एका ग्रँडस्लॅम जेतेपदाने मागे आहे.
त्याचबरोबर कारकीर्दीत चारही ग्रँडस्लॅम जेतेपदे किमान दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा पटकावणारा जोकोव्हिच हा खुल्या पर्वामधील पहिला टेनिसपटू ठरला आहे. ऑस्ट्रेलियन स्पर्धेची नऊ, विम्बल्डनची पाच आणि अमेरिकन स्पर्धेची तीन आणि आता फ्रेंच स्पर्धेची दोन जेतेपदे त्याच्या नावावर आहेत.
जोकोव्हिचचे हे यंदाच्या मोसमातील दुसरे ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले.
महान टेनिसपटू ब्योन बोर्ग यांच्या हस्ते जोकोव्हिचला विजेतेपदाचा करंडक देऊन गौरवण्यात आले.