चालू घडामोडी : १६ एप्रिल २०२१
घाऊक महागाईचा दर आठ वर्षांच्या उच्चांकावर
वाढत्या इंधनाच्या किमतीमुळे गेल्या महिन्यातील घाऊक किमतींवर आधारीत महागाई दर तब्बल आठ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला आहे.
सलग तिसऱ्या महिन्यात महागाई दर उंचावत मार्च २०२१ मध्ये ७.३९ टक्क्यांच्या चिंताजनक पातळीवर झेपावला आहे.
आधीच्या महिन्यात, फेब्रुवारी २०२१ मध्ये घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर ४.१७ टक्के होता. तर वर्षभरापूवी, मार्च २०२० मध्ये तो अवघा ०.४२ टक्के होता.
यापूर्वी, ऑक्टोबर २०१२ मध्ये घाऊक महागाई दर ७.४० टक्के या वरच्या स्तरावर होता. गेल्या महिन्यात इंधन तसेच ऊर्जा गटातील वस्तूंच्या किमती आधीच्या महिन्यातील अध्र्या टक्क्याच्या तुलनेत थेट १०.२५ टक्क्यांपर्यंत भडकल्या.
मार्च २०२१ मध्ये अन्नधान्याच्या किमती ३.२४ टक्क्यांपर्यंत वाढल्या. त्याचबरोबर फळे, भाजीपाला, डाळींचेही दर वाढले. डाळींच्या किमती १३.१४ टक्क्यांपर्यंत वाढल्या. तर भाज्यांच्या किमती (-) ५.१९ टक्के नोंदल्या गेल्या.
खनिज तेल, पेट्रोलियम पदार्थ, पोलाद आदींच्या किमती वार्षिक तुलनेत टाळेबंदीमुळे वाढल्याचे केंद्रीय वाणिज्य व उद्योग खात्याने गुरुवारी मार्च २०२१ मधील एकूण घाऊक किंमत निर्देशांक जाहीर करताना स्पष्ट केले.
पुढील दोन महिन्यांत महागाईचा दर ११ ते ८ टक्के असा उतरता असेल, असे इक्राच्या मुख्य अर्थतज्ज्ञ अदिती नायर यांनी म्हटले आहे. पोलाद, वस्त्र, रसायन आदी वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.
मार्च २०२१ मध्ये हा दर ५.५२ टक्के असा गेल्या चार महिन्यांच्या वरच्या पातळीवर नोंदला गेला आहे.
आशियाई कुस्ती स्पर्धा : सरिताला सुवर्णपदक
भारताची कुस्तीपटू सरिता मोर हिने जोमाने पुनरागमन करत मोंगोलियाच्या शूवदोर बातारजाव हिचे आव्हान परतवून लावत सलग दुुसऱ्यांदा आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली.
सीमा बिस्ला (५० किलो) आणि पूजा (७६ किलो) यांना कांस्यपदक मिळाले.
बातारजावविरुद्ध चाल रचत सरिताने चार गुणांची कमाई केली. त्यानंतर बातारजावला रिंगणाच्या बाहेर ढकलत सरिताने ७-७ अशी बरोबरी साधली. अवघ्या २० सेकंदांचा खेळ शिल्लक असताना सरिताने आणखी एक डावपेच आखत गुण वसूल केले. अखेरीस १०-७ अशा फरकाच्या आधारे सरिताने या स्पर्धेतील सलग दुसरे सुवर्णपदक प्राप्त केले.
भारताचे माजी हॉकीपटू बलबीर सिंग (धाकटे) यांचे निधन
१९५८च्या आशियाई क्रीडा स्पध्रेतील रौप्यपदक विजेत्या भारतीय हॉकी संघाचे सदस्य बलबीर सिंग (धाकटे) यांचे निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते.
बलबीरयांचा जन्म २ मे १९३२ या दिवशी जालंधर येथील संसारपूर येथे झाला.
जालंधरमधील लायॉलपूर खालसा महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले.
१९५१मध्ये त्यांची भारतीय हॉकी संघात प्रथमच निवड झाली. १९६२मध्ये ते सेनादलात अधिकारीपदावर रुजू झाले.
राष्ट्रीय स्पध्रेतही त्यांनी सेनादलाचे प्रतिनिधित्व केले. १९८४मध्ये निवृत्त झाले, तेव्हा त्यांचा हुद्दा मेजर असा होता.
अडीच वर्षांच्या वैदिशाच्या नावाची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
२०० देशाची राजधानी, राष्ट्रध्वज मुखपाठ असल्याने चंद्रपूर येथील वैदिशा शेरेकर या अडीच वर्षांच्या चिमुकलीने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनंतर आता इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले आहे.
वैदिशा जवळपास अडीच वर्षांची झाल्यानंतर तिच्यासाठी सर्व देशांच्या राजधानी व राष्ट्रध्वजाची माहिती असलेले चार्ट आणून त्या माध्यमातून तिला तिची आई दिपाली शेरेकर यांनी माहिती देण्यास सुरूवात केली.
तिने अवघ्या पंधरा वीस दिवसांत २०० पेक्षा अधिक देशांची राजधानी तसेच त्यांचे राष्ट्रीय ध्वज अचूकपणे सांगण्याइतपत तयारी केली.
वैदिशाला २०० देशाहून अधिक देशाची राजधानी मुखपाठ असून या सर्व देशांचे राष्ट्रीय ध्वज ती अचूक ओळखते.
तिच्या या कामगिरीची दखल जानेवारी महिन्यातच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेने घेतली होती.
शिवाय तिचे नावाची नोंद देखील इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये केली गेली आहे.