‘व्हाइट हाऊस’च्या वरिष्ठ सल्लागारपदी नीरा टंडन
भारतीय अमेरिकी धोरणतज्ज्ञ नीरा टंडन यांची व्हाइट हाऊसमध्ये अध्यक्ष जो बायडेन यांचे वरिष्ठ सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
त्यांनी व्हाइट हाऊसमधील अर्थसंकल्प व्यवस्थापन पदासाठी केलेला अर्ज रिपब्लिकनांच्या तीव्र विरोधामुळे दोन महिन्यांपूर्वी माघारी घेतला होता.
रिपब्लिकनांनी परवडणारी आरोग्य सेवा कायदा रद्द केला होता, त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात जे खटले चालतील किंवा जे निकाल येतील त्यावर अध्यक्षांना सल्ला देण्याचे काम नीरा टंडन करणार आहेत. अमेरिकन डिजिटल सेवेचा फेरआढावा त्या घेणार आहेत.
टंडन (वय ५०) या सध्या सेंटर फॉर अमेरिकन प्रोग्रेस या संस्थेच्या अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.
यापूर्वी त्यांनी आरोग्य सल्लागार म्हणून व्हाइट हाऊसमध्ये काम केले आहे.
ओबामा—बायडेन प्रशासनातही टंडन यांनी देशांतर्गत धोरण संचालक म्हणून काम केले होते.
हिलरी क्लिंटन यांच्या अध्यक्षीय निवडणूक प्रचारातही त्यांनी धोरण संचालक म्हणून काम केले होते.
स्वाती पांडे यांना अॅसोचॅमचा ‘वूमन इन सायबर’ पुरस्कार
उद्योग संघटना ‘असोचॅम’द्वारे दिला जाणारा ‘वूमन इन सायबर’ हा राष्ट्रीय पातळीवरील मानाचा पुरस्कार यंदा महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती पांडे यांना प्रदान करण्यात आला.
सहकारी बँकांना सायबर हल्ल्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी केलेल्या उपाययोजना आणि उपक्रमांसाठी त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
केंद्रीय माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव ज्योती अरोरा यांच्या प्रमुख उपस्थितीत आभासी पद्धतीने पार पडलेल्या सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्रातील सहकारी बँकांची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या स्वाती पांडे यांनी सहकारी बँकांवर वाढत असलेल्या सायबर हल्ल्यांना रोखणारी सायबर सिक्युरिटी ऑपरेटिंग सेंटर अर्थात सी सॉक या प्रभावी यंत्रणेच्या कार्यान्वयनाची मोलाची कामगिरी बजावली आहे.
चीनचे रोव्हर यशस्वीरीत्या मंगळावर
अमेरिकेपाठोपाठ आता चीनची रोव्हर गाडीही नऊ मिनिटांचा थरार पार करून मंगळावर उतरली आहे, असे शनिवारी अधिकाऱ्यांनी जाहीर केले.
मंगळावर रोव्हर गाडी उतरवणारा चीन हा दुसरा देश आहे.
‘झुराँग’ असे या रोव्हरचे नाव असून ते अग्नी व युद्ध देवतेवरून ठेवण्यात आले आहे.
युटोपिया प्लॅनशिया या नियोजित भागात ही गाडी उतरवण्यात यश आले आहे. सहा चाकांची ही सौर गाडी २४० किलो वजनाची असून त्यात सहा वैज्ञानिक उपकरणे आहेत.
नेपाळच्या पंतप्रधानपदाची ओली यांना तिसऱ्यांदा शपथ
नेपाळच्या पंतप्रधानपदी के. पी. शर्मा ओली यांचा शपथविधी झाला. ते तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले आहेत.
ओली हे कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ-यूएमएल या पक्षाचे अध्यक्ष असून सोमवारी प्रतिनिधिगृहात त्यांचा विश्वासदर्शक ठरावात पराभव झाला होता.
ओली यांना आता पुन्हा तीस दिवसांत विश्वासदर्शक ठराव मांडून तो संमत करून दाखवावा लागेल. अन्यथा राज्यघटनेच्या अनुच्छेद ७६(५) अन्वये सरकार स्थापनेचे प्रयत्न करावे लागतील. यापूर्वी ते ११ ऑक्टोबर २०१५ ते ३ ऑगस्ट २०१६ दरम्यान पंतप्रधान होते.
त्यानंतर पुन्हा १५ फेब्रुवारी २०१८ ते १३ मे २०२१ या काळात ते पंतप्रधान होते.
पोवार पुन्हा भारतीय महिला प्रशिक्षक
भारताचे माजी फिरकीपटू रमेश पोवार यांची पुन्हा एकदा भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
डब्ल्यू. व्ही. रामन यांच्याकडून ते प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतील.
‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या संचालक मंडळावर हृषिकेश मोडक
राष्ट्रीयीकृत बँक ऑफ महाराष्ट्रच्या संचालक मंडळावर हृषिकेश अरविंद मोडक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भारत सरकारने १३ मे २०२१ रोजीच्या अधिसूचने अन्वये सरकारचे नामनिर्देशित संचालक म्हणून मोडक यांची नियुक्ती जाहीर केली आहे.
हृषिकेश मोडक हे मणिपूर कॅडरचे भारतीय प्रशाकीय सेवेतील अधिकारी आहेत.
त्यांनी सावित्रीबाई फुले (पुणे) विद्यापीठाशी संलग्न फग्र्युसन महाविद्यालयातून अर्थशास्त्राात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.
केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या वित्त सेवा विभागात उपसचिव म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी मोडक यांनी महाराष्ट्र राज्यातील वाशीम येथे जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी म्हणून काम केले आहे. हृषिकेश मोडक यांनी विक्रीकर आयुक्त व मणिपूर राज्यातील उखरूळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी म्हणूनदेखील काम केले आहे.