⁠  ⁠

चालू घडामोडी – १९ एप्रिल २०१६

Tushar Bhambare
By Tushar Bhambare 4 Min Read
4 Min Read
देश-विदेश

डिल्मा रूसेफ यांच्यावर महाभियोगाचा प्रस्ताव मंजूर
लॅटिन अमेरिकेतील सर्वात मोठा देश असलेल्या ब्राझीलमध्ये कायदेमंडळाच्या कनिष्ठ सभागृहाने अध्यक्ष डिल्मा रूसेफ यांच्याविरोधात महाभियोगाची कारवाई सुरू करण्यास परवानगी दिली आहे. डिल्मा यांच्या विरोधकांना ५१३ पैकी ३४२ म्हणजे दोन तृतीयांश मते आवश्यक होती, ती मिळाली आहेत. त्यामुळे आता हा प्रस्ताव सिनेटकडे जाईल. तेथे डिल्मा यांच्यावर महाभियोग चालवायचा की नाही याचा निर्णय मे महिन्यात होईल. कनिष्ठ सभागृहात पाच तासांच्या चर्चेनंतर डिल्मा रूसेफ यांच्यावर महाभियोगाचा खटला चालवायचा की नाही या मुद्दय़ावर चर्चा झाली. एकूण ३४२ मते मिळाल्यानंतर विरोधकांनी सभागृहात एकच जल्लोष केला.

लैंगिक समानता हा ‘घटनात्मक संदेश’
लैंगिक समानता हा ‘घटनात्मक संदेश’ असून, विशिष्ट वयोगटातील महिलांना ऐतिहासिक शबरीमाला मंदिरात प्रवेशास बंदी घालणे हा व्यवस्थापनाचा धार्मिक व्यवहार हाताळण्यासाठीचा हक्क असल्याचा दावा केला जाऊ शकत नाही, असे स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी व्यक्त केले.

ईशान्येकडील राज्यांना सर्वात वेगवान महासंगणक मिळाला
सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून तयार केलेला वेगवान महासंगणक सिक्कीमला देण्यात आला आहे. या महासंगणकाची गणनक्षमता १५ टेराफ्लॉप आहे. सिक्कीमच्या ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ या संस्थेत गंगटोक येथे परम कांचनजुंगा हा महासंगणक ठेवण्यात आला असून सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अ‍ॅडव्हान्सड कॉम्प्युटिंग व दूरसंचार-माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांनी संयुक्तपणे तो तयार केला आहे. राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते या महासंगणकाचे अनावरण झाले.

महाराष्ट्र

किल्ले सिंधुदुर्गला सागरी सफरीने मानवंदना
किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव ३५० वर्षांचा या कार्यक्रमाचे औचित्य साधून मुंबई येथून चौघांची टीम शिडाच्या बोटीसह २१ एप्रिल रोजी मालवण सिंधुदुर्ग किल्ला येथे दाखल होणार आहे. या टीममध्ये मुंबई पोर्ट ट्रस्टचे कर्मचारी भानुदास झाजम, महादेव कोयंडे, दिगंबर कोळी आणि १७ वर्षीय प्रतीक झाजम यांचा समावेश आहे, अशी माहिती किल्ले प्रेरणोत्सव समितीतर्फे देण्यात आली. किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव २२ ते २४ एप्रिल या कालावधीत होत आहे. त्यानिमित्त शिवप्रेरणा यात्रेसह विविध कार्यक्रम होणार आहेत. या महोत्सवाला किल्ल्याचा ३५० वर्षांचा इतिहास जागविला जाणार आहे.

क्रीडा

मेस्सी @ 500
सध्याचा फुटबॉल सुपरस्टार लियोनेल मेस्सीने कारकिर्दीतील 500 वा गोल करण्याचा विक्रम केला असला, तरी तो आपल्या बार्सिलोना संघाला पराभवापासून रोखू शकला नाही. सध्या पराभवाच्या खाईत हेलकावे खात असलेल्या बार्सिलोनाच्या हातून आता स्पॅनिश लीगचे विजेतेपद निसटण्याची चिन्हे दिसत आहेत. रविवारी झालेल्या सामन्यात त्यांना तुलनेने दुबळ्या व्हॅलेन्सियाकडून 1-2 अशा पराभवाचा सामना करावा लागला.

अर्थशास्त्र

पीएफ खात्यातील रक्कम काढण्यासंबंधीच्या निर्बंधांना ३१ जुलैपर्यंत स्थगिती
कामगार संघटनांच्या वाढत्या विरोधामुळे केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून भविष्य निर्वाह निधीसंबंधीच्या (पीएफ) सुधारित प्रस्तावाला तीन महिन्यांसाठी स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे पीएफ खात्यातील रक्कम काढण्यावर १ मेपासून लागू होणारे निर्बंध आता ३१ जुलै २०१६ पर्यंत स्थगित राहतील.आम्ही संबंधितांशी चर्चा करून याबाबतचा निर्णय घेऊ, अशी माहिती कामगार मंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी दिली.

घर, उपचार, शिक्षणासाठी पूर्ण ‘पीएफ’ मिळणार
नवी दिल्ली : भविष्य निर्वाह निधीबाबतच्या नव्या नियमांमुळे नोकरदारांचा रोष ओढविल्यानंतर केंद्राने प्रस्तावित नियम 1 मे ऐवजी 1 ऑगस्टपासून लागू करण्याचे ठरविले आहे. या निर्णयातील बदलाबाबत ‘द हिंदू‘ या इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. तसेच, काही नियम शिथिल करण्याचे सरकारने ठरविले आहे. त्यानुसार घर खरेदी किंवा बांधकाम, स्वत:च्या किंवा कुटुंबातील सदस्याच्या वैद्यकीय उपचारांसाठी पीएफची पूर्ण रक्कम काढण्याची तरतूद करण्यात येणार आहे.

TAGGED:
Share This Article