चालू घडामोडी : २१ नोव्हेंबर २०२०
Current Affairs : 21 November 2020
डग्लस स्टुअर्ट यांच्या “शुगी बेन’ला बुकर पुरस्कार
न्यूयॉर्क स्थित आणि मूळ स्कॉटलंडचे नागरिक असलेले लेखक डग्लस स्टुअर्ट यांच्या “शुगी बेन’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकला या वर्षीचे बुकर पारितोषिक जाहीर झाले आहे.
स्टुअर्ट यांचे हे पहिलेच पुस्तक असून या पुस्तकात त्यांनी 1980 च्या काळात प्रेम आणि मद्याच्या आहारी जाण्याबाबतच्या अनुभवांचे कथन केले आहे.
भारतीय वंशाच्या लेखिका अवनी दोषी यांच्या “बर्न्ट शुगर’ या पुस्तकाला मात्र यंदाच्या बुकर पारितोषिकाने हुलकावणी दिली.
बुकर पुरस्कारासाठीच्या संभाव्य 6 लेखकांच्या यादीमध्ये दुबईस्थित भारतीय वंशाच्या लेखिका अवनी दोषी यांच्या “बर्न्ट शुगर’ या पुस्तकाचाही समावेश होता. मात्र, त्यांना पुरस्कार मिळू शकला नाही.
पाकिस्तानात सापडलं भगवान विष्णूचं १३०० वर्षांपूर्वीचं मंदिर
पाकिस्तानमधील स्वात जिल्ह्यात एका पर्वतावर पाकिस्तान आणि इटलीच्या पुरातत्त्वतज्ज्ञांनी तेराशे वर्षांपूर्वीचं एक हिंदू मंदिर शोधलं आहे.
पुरातत्त्वतज्ज्ञांनी शोधलेलं हे मंदिर भगवान विष्णूचं असल्याचं सांगितलं जात आहे.
खैबर पख्तुनख्वा प्रांतातील पुरातत्त्व खात्यातील अधिकारी फजल खालिक यांनी या शोधाची घोषणा करताना सापडलेले मंदिर हे भगवान विष्णूंचं असल्याचं सांगितलं.
वायव्य पाकिस्तानच्या स्वात जिल्ह्यात बारिकोट घुंडई येथे उत्खननादरम्यान मंदिराचा शोध लागला आहे.
अर्थवृद्धी अंदाजात सुधार
केंद्र सरकारने जाहीर केलेले ‘आर्थिक पॅकेज’ देशातील निर्मिती क्षेत्राला प्रोत्साहन देणारे असून रोजगारवाढीचे प्रमाणही त्यातून विस्तारेल, असा आशावाद मूडीजने व्यक्त केला आहे. परिणामी भारताचा चालू आर्थिक वर्षांत विकास दर आधीच्या अंदाजापेक्षा काहीसा अधिक म्हणजे उणे १०.६ टक्के राहिल, असेही तिने स्पष्ट केले आहे.
अमेरिकी संस्थेचा २०२०-२१ आर्थिक वर्षांसाठी भारताच्या विकास दराचा अंदाज उणे ११.५ टक्के असा होता. केंद्राने तिसऱ्या टप्प्यातील आर्थिक प्रोत्साहनाच्या योजना ऐन दिवाळीच्या तोंडावर जाहीर केल्या. २.७० लाख कोटी रुपयांच्या १२ प्रोत्साहनपूरक योजनांचा त्यात समावेश होता. प्रामुख्याने रोजगारनिर्मितीला बळ देण्याचा सरकारचा त्यातून प्रयत्न दिसला आहे.
सरकारच्या ताज्या योजना या निर्मिती क्षेत्राला प्राधान्य देणाऱ्या आणि रोजगारवाढ करणाऱ्या आहेत, असे स्पष्ट करून मूडीजने यामुळे पायाभूत गुंतवणुकीलाही चालना मिळून सकारात्मक पतमानांकन नोंदविले जाण्याचे संकेत दिले आहेत. फिच व एस अँड पीने अनुक्रमे १०.५ व ९ टक्के विकास दर असेल, असे यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
मूडीजने चालू आर्थिक वर्षांत उणे ११.५ टक्के प्रवास नोंदविण्याची शक्यता असलेला विकास दर अंदाज सप्टेंबर २०२० मध्ये व्यक्त केला होता. नव्या अंदाजासह पुढील वित्त वर्षांत – २०२१-२२ मध्ये विकास दर (सकारात्मक) १०.८ टक्के असेल, असेही नमूद करण्यात आले आहे. सरकारने टाळेबंदी लागू झाल्यानंतर ३० लाख कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य जाहीर केले आहे.