जीडीपी विकास दर 10.2 टक्के राहण्याची शक्यता
केअर रेटिंग्जने आर्थिक वर्ष 2021-22 साठी भारताचा जीडीपी (सकल देशांतर्गत उत्पादन) (GDP) विकास दर कमी करुन 10.2 टक्के केला आहे.
याआधी विकास दर 10.7 ते 10.9 टक्के राहील, असा अंदाज व्यक्त केला होता.
मागील एका महिन्यात पतमानांकन संस्थेने अंदाजात सुधारणा करण्याची ही तिसरी वेळ आहे. केअर रेटिंग्जने एका अहवालात म्हटले आहे की त्यांनी 2021-22 मधील जीडीपी (GDP) वाढीच्या अंदाजात सुधारणा केली आहे. त्यांनी म्हटले आहे की गेल्या 30 दिवसात झालेल्या बदलांमुळे अंदाजात सुधारणा करण्यात आली आहे. त्यांनी तो आता कमी करुन 10.2 टक्क्यांवर आणला आहे.
आधी 11 ते 11.2 टक्के रहाण्याचा अंदाज होता
केअर रेटिंग्जने याआधी 24 मार्च 2021 रोजी जीडीपी (GDP) विकास दर 11 ते 11.2 टक्के राहील असा अंदाज वर्तविला होता. राज्यातील निर्बंधांमुळे आर्थिक घडामोडींवर परिणाम झाल्याने 5 एप्रिलला संस्थेने 2020-21 मधील जीडीपीचा अंदाज 10.7 वरून 10.9 टक्क्यांपर्यंत खाली आणला होता.
फेब्रुवारीपर्यंत २.७४ लाख कोटींची कृषी जिनसांची निर्यात
कोविड-१९ असतानाही भारताने या वर्षी फेब्रुवारीपर्यंत २.७४ लाख कोटी रुपयांची कृषी कामोडिटीची निर्यात केली आहे.
वार्षिक आधारावर ही १६.८८ टक्क्यांची वाढ आहे. गेल्या वर्षी या अवधीत २.३१ लाख कोटी मूल्याची कृषी जिनसांची निर्यात केली होती.
कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कृषी आणि संबंधित कमोडिटीमध्ये आयातीत ३ टक्के वाढ नोंदली आहे. २०२०-२१ एप्रिलपासून फेब्रुवारीदरम्यान १,४१,०३४ कोटी रुपयांची आयात केली. याआधी या अवधीत १,३७,०१४ कोटी रु. होती. या हिशेबाने भारताचा कृषी व्यापार ताळेबंद सकारात्मक राहिला.
हा गेल्या वर्षी ९३,९०७.७६ कोटीहून वाढून १,३२,५७९.६९ कोटी रुपये नोंदला होता. कोविड-१९ महामारीच्या कठीण काळातही भारताने फूड चेन सुरू ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न केला.
सागरी पर्यावरणात प्रवेश करणार्या प्लास्टिकशी लढा देण्यासाठी भारताचा जर्मनीसोबत करार
गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालय आणि GIZ GmbH इंडिया (जर्मनीची संस्था), नेचर कन्झर्वेशन अँड न्यूक्लियर-सेफ्टी या संस्थांनी ‘सागरी पर्यावरणात प्रवेश करणार्या प्लास्टिकशी झुंज देणारी शहरे’ ही शीर्षक असलेल्या तांत्रिक सहकार्य प्रकल्पासाठी करार केला आहे.
महत्वाचे :
– समुद्रामध्ये प्लास्टिकचा प्रवेश रोखण्याच्या पद्धती वाढविण्याच्या उद्देशाने या प्रकल्पाची रचना केली गेली आहे.
– हा प्रकल्प उत्तरप्रदेश, केरळ आणि अंदमान व निकोबार बेटे या राज्यांमध्ये तसेच कानपूर, कोची व पोर्ट ब्लेअर या शहरांमध्ये राबविण्यात येईल.
– साडेतीन वर्षांच्या कालावधीत हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. असा अंदाज आहे की जगातील सर्वाधिक प्रदूषित 10 नद्यांद्वारे सर्व प्लास्टिक कचऱ्याचे 15-20 टक्के महासागरामध्ये प्रवेश करीत आहे. जगातील सर्वाधिक प्रदूषित 10 नद्यांपैकी दोन ‘गंगा आणि ब्रह्मपुत्र’ या भारतामध्ये आहेत.
आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिन: 22 एप्रिल
पृथ्वीच्या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी 22 एप्रिल या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिन’ (वसुंधरा दिन) जगभर साजरा करतात.
वर्ष 2021 मधील आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिनाची संकल्पना “रिस्टोअर अवर अर्थ” ही संकल्पना होती.
पार्श्वभूमी :
– पर्यावरणाच्या रक्षणाची शिकवण देण्याच्या हेतूने अमेरिकेचे आमदार गेलॉर्ड नेल्सन ह्यांनी 22 एप्रिल 1970 रोजी पहिल्यांदा पृथ्वी दिनाचे अमेरिकेत आयोजन केले होते. पहिला पृथ्वी दिन अमेरिकेत पाळला गेला, तरीही त्या कार्यक्रमाचा राष्ट्रीय समन्वयक असलेले डेनिस हेस ह्यांनी स्थापन केलेल्या संस्थेनी 1990 साली 141 देशांमध्ये या दिवसाचे आयोजन करून पृथ्वी दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर नेला.
– सध्या 1970 साली स्थापन करण्यात आलेल्या ‘अर्थ डे नेटवर्क’ या संस्थेच्या समन्वयाने 175 देशांमध्ये हा दिवस साजरा केला जातो. 2009 साली संयुक्त राष्ट्रसंघानी 22 एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिन म्हणून पाळण्याची घोषणा केली.
महत्वाचे :
– हरित वायूच्या उत्सर्जनाचे प्रमाण 1990 साली आलेल्या पातळीच्या 50 टक्क्यांहून अधिक असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) या संघटनेनी नमूद केले आहे. वायू प्रदूषणामुळे जगभरात दरवर्षी 7 दशलक्ष मृत्यू होत आहे.
– हवामानविषयक ठोस कृतीमुळे 2030 सालापर्यंत आर्थिक लाभ 26 महादम (लक्ष कोटी) अमेरिकी डॉलरपर्यंत पोहोचू शकतो आणि शाश्वत ऊर्जेवर लक्ष्य केंद्रित केल्यास केवळ ऊर्जा क्षेत्रातच 18 दशलक्ष अधिक रोजगार निर्माण होऊ शकतात.
– अश्या परिस्थितीत अक्षय ऊर्जा, हरित इमारत संकल्पना, स्वच्छ तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रिक वाहने यांचा अवलंब करणे ही काळाची गरज ठरीत आहे. तसेच तळागाळातल्या समुदायांनी वृक्षारोपणासारखे प्रकल्प मोठ्या प्रमाणावर हाती घेणे आणि नैसर्गिक स्त्रोतांच्या संवर्धनासाठी त्यांचा कमी वापर, पुनर्वापर आणि पुनर्चक्रीकरणाचा मंत्र अवलंबवणे आवश्यक आहे.
भारतीय महिलांचे ‘सुवर्णसप्तक’
जागतिक युवा बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या महिला खेळाडूंनी ‘सुवर्णसप्तक’ साकारले. पोलंड येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत गुरुवारी भारताकडून गितिका, अरुंधती चौधरी, बेबीरोजिस्ना चानू, पूनम, सानामचा चानू, विन्का आणि अल्फिया पठाण या सात जणींनी सुवर्णपदकावर नाव कोरले.
महिलांच्या ४८ किलो वजनी गटात गितिकाने पोलंडच्या नतालिया कुझेव्हस्कावर ५-० असा विजय मिळवला. आशियाई विजेत्या बेबीरोजिस्नाने रशियाच्या व्हॅलेरिया लिंकोव्हाला ५-० अशी धूळ चारून ५१ किलो वजनी गटाचे जेतेपद मिळवले. सानामचाने (७५) किलो) कझाकस्तानच्या दाना दिदायवर ५-० असे वर्चस्व गाजवले.
अरुंधतीने (६९ किलो) पोलंडच्या बार्बोरा मार्किनकोव्हस्काला ५-० असे नमवले. पूनमने फ्रान्सच्या स्टेलीन ग्रोसीवर ५-० अशी मात करून ५७ किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली. तर विन्काने (६० किलो) अंतिम फेरीच्या सुरुवातीलाच कझाकस्तानच्या हुल्डी शायाकमेटोव्हावर जोरदार प्रहार करून तिला सामन्यातून माघार घेण्यास भाग पाडले. अल्फियाने (८१+) मोल्डोव्हाच्या दारिया कोझोरेझला ५-० असे नामोहरम केले.
सात सुवर्णांसह भारताने २०१७च्या हंगामातील कामगिरीला मागे टाकले. त्यावेळी भारतीय महिलांनी तीन सुवर्णपदक मिळवले होते. शुक्रवारी पुरुषांच्या ५६ किलो वजनी गटात भारताचा सचिन सुवर्णपदकासाठी झुंजताना दिसणार आहे.