Current Affairs : 23 February 2021
‘ब्रिक्स’ यजमानपदासाठी भारताला चीनचा पाठिंबा

ब्रिक्स शिखर परिषदेचे या वर्षीचे यजमानपद भारताने स्वीकारण्यास चीनने पाठिंबा दर्शविला असून पाच सदस्य असलेल्या देशांमधील सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी भारतासमवेत काम करण्याची तयारीही दर्शविली आहे.
भारताने २०२१ च्या ब्रिक्स शिखर परिषदेचे (ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका) अध्यक्षपद स्वीकारण्याचे गृहीत धरले असून त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे.
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी १९ फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या सुषमा स्वराज भवनातील ब्रिक्स सचिवालयात भारताचे ब्रिक्स २०२१ संकेतस्थळ सुरू केले.
यावर्षीच्या ब्रिक्स परिषदेचे यजमानपद भारताने स्वीकारण्याचे ठरविले आहे त्या बाबत विचारले असता चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी, भारताने ब्रिक्सचे यजमानपद स्वीकारण्यास चीनचा पाठिंबा असल्याचे, सांगितले.
ब्रिक्स हा आता आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये सकारात्मक, स्थिर आणि रचनात्मक शक्ती आहे, असे ते म्हणाले. मात्र, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग शिखर परिषदेला उपस्थिती राहणार आहेत का, त्याबाबत वांग यांनी कोणतेही भाष्य केले नाही.
आनंद ‘ग्लोबल चेस लीग’चासूत्रधार

बुद्धिबळामधील पहिल्यावहिल्या ‘ग्लोबल चेस लीग’ची महत्त्वाची सूत्रे टेक महिंद्राने माजी विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदकडे सोपवली आहेत.
जगातील व्यावसायिक बुद्धिबळपटूंचा समावेश असलेले आठ संघ यात समाविष्ट असतील. प्रत्येक संघात पुरुष, महिला आणि कनिष्ठ खेळाडूंचा समावेश असेल.
राऊंड रॉबिन लीग पद्धतीने हे सामने होणार असून, स्पर्धेचा आराखडा येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल, असे संयोजकांकडून सांगण्यात आले आहे.
पुद्दुचेरीत अखेर काँग्रेस सरकार कोसळले

पुदुचेरीतील काँग्रेस सरकार कोसळले आहे.
मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांना विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावेळी बहुमत सिद्ध करण्यात अपयश आले.
त्यामुळे व्ही. नाराणसामी आणि काँग्रेसच्या आमदारांनी बहुमत चाचणीआधीच सभात्याग केला.
काँग्रेस आणि द्रमुकच्या प्रत्येकी एक आमदाराच्या राजीनाम्याने ३३ सदस्य असलेल्या विधानसभेत सत्तारुढ काँग्रेस आघाडीचे संख्याबळ ११ पर्यंत घसरले होते.
विरोधी आघाडीकडे १४ सदस्य, तर सात जागा रिक्त आहेत. यामुळे नारायणस्वामी यांच्या सरकारवर बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली होती.
पण विश्वासदर्शक ठरावात बहुमत सिद्द न करता आल्याने काँग्रेसचे सरकार कोसळले आहे.