⁠  ⁠

चालू घडामोडी – २६ जून २०१६

Tushar Bhambare
By Tushar Bhambare 2 Min Read
2 Min Read

देश-विदेश

अमेरिकेकडून १४५ तोफा घेण्यास मान्यता
# संरक्षण मंत्रालयाने पाच हजार कोटी रुपये खर्चून अमेरिकेकडून १४५ हलक्या हॉवित्झर तोफा आणि १८ धनुष तोफा खरेदी करण्यास शनिवारी मान्यता दिली. जवळपास तीन दशकांपूर्वी बोफोर्स घोटाळा उघडकीस आल्यानंतर प्रथमच लष्कराने शस्त्रे खरेदीला मान्यता दिली आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण संपादन कौन्सिलच्या झालेल्या बैठकीत २८ हजार कोटी रुपयांच्या नव्या योजनांसह १८ प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे १३ हजार ६०० कोटी रुपयांच्या क्षेपणास्त्र नौका उभारणीबाबत ‘बाय इंडियन’ वर्गवारीत निविदा जारी करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.

ब्रिटनचे युरोपीय समुदाय आयुक्त जोनाथन गील राजीनामा देणार
# ब्रेग्झिटच्या निर्णयानंतर ब्रिटनचे युरोपीय समुदाय आयुक्त जोनाथन गील यांनी राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. देशाने युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा घेतलेला निर्णय दुर्दैवी असून आता जे घडले त्यात आता काही बदल होणार नाही, असे सांगून ते म्हणाले की, जे घडले त्या स्थितीत मी आयुक्तपदी राहावे असे मला वाटत नाही, युरोपीय आयोगाच्या अध्यक्षांशी चर्चा झाली असून त्यानुसार हा निर्णय घेत आहे. गील हे हाऊस ऑफ लॉर्ड्सचे माजी सदस्य असून मावळते पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी त्यांना युरोपीय आयोगाचे सदस्य नेमले होते. येथील अनेक लोकांप्रमाणेच मी निराश झालो आहे, ब्रेग्झिट होईल असे वाटले नव्हते, पण ब्रिटिश जनतेने वेगळाच निर्णय घेतला आहे, लोकशाही अशीच काम करीत असते.

क्रीडा

द्युती चंदला ऑलिम्पिक तिकीट
# लिंग चाचणीबाबत न्यायालयीन लढाई जिंकल्यानंतर अ‍ॅथलेटिक्समध्ये पुनरागमन केलेल्या द्युती चंदचा ऑलिम्पिक प्रवेश निश्चित झाला आहे. ती शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत सहभागी होणार आहे. कझाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय मैदानी स्पर्धेत चंदने १०० मीटर शर्यतीत राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. वीस वर्षीय खेळाडू चंदने हे अंतर ११.३० सेकंदांत पार करीत स्वत:चाच ११.३३ सेकंद हा विक्रम मोडला. हा विक्रम नोंदविताना तिने ११.३२ सेकंद ही ऑलिम्पिक पात्रताही पूर्ण केली.

TAGGED:
Share This Article