देश-विदेश
संरक्षण ‘पीएसयूं’वर “कॅग’चा आसूड
# नवी दिल्ली – संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक कंपन्यांच्या (पब्लिक सेक्टर युनिट्स-पीएसयू) खराब कामगिरीमुळे देशाला संरक्षण उत्पादनाबाबत स्वयंपुर्णतेचे उद्दिष्ट गाठण्यास अपयश येत असून, यामुळे भारतीय लष्कराच्या महत्त्वाच्या योजनांवर नकारात्मक परिणाम होत आहे, अशी परखड टीका महालेखापरीक्षक (कॅग) अहवालात करण्यात आली आहे. संरक्षण क्षेत्रातील सरकारी मालकी असलेल्या कंपन्यांना 2007 ते 2012 दरम्यान बहाल करण्यात आलेल्या एकुण कंत्राटांपैकी तब्बल 63 टक्के प्रकल्प विविध कारणांमुळे अद्याप अपूर्ण आहेत, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय, “प्रकल्पपुर्तीसाठी होणाऱ्या विलंबामुळे लष्कराचे नुकसान झालेच आहे; परंतु कंपन्यांना देण्यात आलेल्या आगाऊ रकमेवरील व्याजाचेदेखील नुकसान झाले आहे. याशिवाय, संरक्षण उत्पादनाबाबत स्वयंपूर्णता साध्य करण्याचे उद्दिष्टदेखील पुर्ण होऊ शकलेले नाही”, असे कॅगने म्हटले आहे.
भारताच्या टी.एम.कृष्णा आणि बेझवाडा विल्सन यांना मॅगसेसे पुरस्कार
# सुप्रसिद्ध कर्नाटकी संगीतकार टी.एम. कृष्णा आणि सामाजिक कार्यकर्ते बेझवाडा विल्सन या दोन भारतीयांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. इतर तिघांमध्ये फिलिपाईन्सचे कोंकिथा कारपिओ-मोरालेस, इंडोनेशियाचे डॉम्पेट दुआफा , जपान ओव्हरसीज कॉर्पोरेशन आणि लाओस येथील व्हिएतियन रेस्क्यू या संस्थांचा समावेश आहे. चेन्नईच्या ४० वर्षीय टी.एम. कृष्णा सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याबद्दल या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांनी आपल्या गायनामधून सामाजिक सलोखा जपला आहे. कृष्णा यांनी भारतीय संस्कृतीची ओळख आपल्या गायनामधून करून देत, दलित व इतर वर्गाच्या समुदायाला संगीताची ओळख करुन दिली. तर बेझवाडा विल्सन यांना मानवी प्रतिष्ठेच्या मुलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी केलेल्या कार्याबद्दल मॅगसेसे पुरस्कार देण्यात आला. त्यांनी सफाई कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीय आंदोलन केले होते. मानवी हक्क मिळवून देण्यासाठी ते लढत आहेत. फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार १९५७ पासून सुरू करण्यात आला. आतापर्यंत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी, सामाजिक कार्यकर्त्यां अरूणा रॉय यांच्यासह काही भारतीयांना हा पुरस्कार मिळाला आहे.
जीएसटीवर सर्व राज्यांची सहमती
# सर्वाचे लक्ष लागलेल्या वस्तू आणि सेवा कर विधेयकातील (जीएसटी) एक टक्का अतिरिक्त शुल्क रद्द करण्याबरोबरच संभाव्य महसूल नुकसानीची भरपाई राज्यांना पुढील पाच वर्षांसाठी देण्याची एकमुखी शिफारस मंगळवारी केंद्र सरकारला करण्यात आली. सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या परिषदेमध्ये राज्यांनी जीएसटीवर पुन्हा एकदा सर्वसहमती व्यक्त केली असून, त्यांच्या तीन प्रमुख मागण्यांपैकी एक टक्का अतिरिक्त कर रद्द करण्याची मागणी मान्य झाली आहे. त्यामुळे आता काँग्रेस कोणती भूमिका घेणार, याची उत्सुकता वाढली आहे. या बैठकीतील निर्णयांच्या आधारे सुधारित विधेयक ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात राज्यसभेत मांडले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
क्रीडा
कुस्ती महासंघाकडून प्रवीण राणाची निवड
# महाराष्ट्राचा कुस्तीपटू नरसिंग यादव याची रिओ ऑलिम्पिकची वारी हुकल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. भारतीय कुस्ती महासंघाकडून नरसिंगऐवजी प्रवीण राणा याची निवड करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या उत्तेजक चाचणीत नरसिंग यादव दोषी आढळला होता. मात्र, आपल्याविरुद्ध कटकारस्थान रचण्यात आल्याचा आरोप करत नरसिंगने याप्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. मात्र, कुस्ती महासंघाकडून नरसिंगऐवजी प्रवीण राणाची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे नरसिंगचे स्वप्न भंगले आहे.
आयसीसी क्रमवारीत अश्विन अव्वल
# भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. त्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताने पहिली कसोटी एक डाव व ९२ धावांनी जिंकली. या वर्षांच्या सुरुवातीला अश्विनला अव्वल स्थान गमवावे लागले होते, परंतु विंडीजविरुद्ध ८३ धावांत सात गडी बाद करून त्याने ते पुन्हा मिळवले. याचबरोबर त्याने फलंदाजांच्या यादीतही तीन स्थानांची सुधारणा करून ४५वे स्थान पटकावले. अश्विनने (७/८३ व ११३ धावा) अष्टपैलू खेळ करून अष्टपैलू खेळाडूंमध्ये असलेल्या अव्वल स्थानावरील पकड अधिक मजबूत केली. अश्विनने पाकिस्तानचा फिरकीपटू यासिर शाहला मागे टाकून गोलंदाजांच्या क्रमवारीत भरारी घेतली. यासीरने गेल्या आठवडय़ात इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत दहा गडी बाद केले होते. मात्र, दुसऱ्या कसोटीत त्याला केवळ एका बळीवर समाधान मानावे लागले आणि त्यामुळे त्याची पाचव्या स्थानी घसरण झाली.
बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांची नवी इनिंग
# भाजप खासदार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष अनुराग ठाकूर येत्या शुक्रवारी प्रादेशिक सेनेत (Territorial Army ) दाखल होणार आहेत. लष्करात दाखल होणारे ते भाजपचे पहिलेच सदस्य आहेत. लेखी परीक्षा आणि चंदीगढ येथे झालेल्या वैयक्तिक मुलाखतीनंतर ठाकूर यांची प्रादेशिक सेनेतील साधारण दर्जाचा अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. अनुराग ठाकूर हे हिमाचल प्रदेशातील हमीरपूर येथील खासदार आहे. प्रादेशिक सेनेतील साधारण अधिकारी म्हणून त्यांना आता प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे. भारतीय लष्कराखालोखाल प्रादेशिक सेना ही दुसरी सुरक्षा यंत्रणेची फळी आहे.