चालू घडामोडी : ३१ ऑगस्ट २०२१
भालाफेकपटू सुमित अंतिलनं पटकावलं सुवर्ण
टोक्यो पॅरालिम्पिकमधून भारतासाठी आणखी एक चांगली बातमी समोर आली आहे. सुमित अंतिलने भालाफेकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देत इतिहास रचला आहे. एवढेच नव्हे, तर या कामगिरीसोबत सुमितने विश्वविक्रमही मोडला आहे. त्याने एफ-६४ प्रकारात ६८.५५ मीटर लांब भाल फेकत विश्वविक्रम आपल्या नावावर केला. याआधी नीरज चोप्राने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्येच सुवर्णपदक पटकावले होते.
भारताला सलग दुसरे सुवर्ण
पॅरालिम्पिकमध्ये भारताची शानदार कामगिरी सुरूच आहे. सुमितच्या आधी भारताला नेमबाजीतही सुवर्णपदक मिळाले आहे. भारतासाठी हे सलग दुसरे सुवर्ण आहे. अवनी लेखराने नेमबाजीत सुवर्णपदक पटकावले.
सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी नऊ न्यायाधीशांना दिली शपथ
सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी एकाचवेळी नऊ न्यायाधीशांना शपथ दिली.
या ९ न्यायाधीशांमध्ये तीन महिला न्यायाधीशांचा समावेश आहे. सरन्यायाधीश एनवी रमण यांनी नऊ न्यायाधीशांना शपथ दिली.
श्रीनिवास ओका, विक्रम नाथ, जितेंद्र कुमार माहेश्वरी, हिमा कोहली, बीवी नागरत्ना, सीटी रविकुमार, एमएम सुंदरेश, बेला एम त्रिवेदी आणि पीएस नरसिम्हा यांनी शपथ घेतली.
नऊ न्यायाधीशांनी शपथ दिल्यानंतर सरन्यायाधीशांसह न्यायाधीशांची संख्या ३३ झाली आहे. तर स्वीकृत संख्या ३४ असल्याने अजूनही एक जागा रिक्त असणार आहे.
सरन्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली १७ ऑगस्टला झालेल्या बैठकीत ९ नवीन न्यायाधीशांच्या नावाला मंजुरी दिली होती. २०१९ नंतर एकाही न्यायाधीशाची नियुक्ती झाली नव्हती. १७ नोव्हेंबर २०१९ रोजी माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई निवृत्त झाल्यापासून नियुक्त्या रखडल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने नऊ नावांची शिफारस २२ महिन्यांनंतर पाठवली होती.
दुसरीकडे न्यायाधीश नागरत्ना या सप्टेंबर २०२७ मध्ये पहिल्या महिला सरन्यायाधीश बनण्याची शक्यता आहे. पदोन्नती मिळाल्यास २०२७ मध्ये देशाच्या पहिली महिला सरन्यायाधीश बनू शकतात. जस्टीस नागरत्ना या माजी सरन्यायाधीश ई एस वेंकटरमैया यांच्या कन्या आहेत. न्यायमूर्ती नागरत्न व्यतिरिक्त, पाच सदस्यीय कॉलेजियमने निवडलेल्या इतर दोन महिला न्यायाधीशांमध्ये तेलंगणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती हिमा कोहली आणि गुजरात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बेला त्रिवेदी यांचा समावेश आहे. दरम्यान पी एस नरसिम्हा यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. पी एस नरसिम्हा थेट बारमधून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले आहेत. १९९३ मध्ये न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी कॉलेजियम प्रणाली अस्तित्वात आल्यापासून नरसिम्हा बारमधून थेट सर्वोच्च न्यायालयात येणारे सहावे वकील बनले आहेत.
शेअर बाजाराचा नवा विक्रम; सेन्सेक्स ५७ हजारांच्या पार
भारतीय शेअर बाजारात आज पुन्हा एकदा विक्रमी वाढीसह सुरुवात झाली आहे. शेअर बाजार उघडताच सकाळच्या सत्रात सेन्सेक्स ५७ हजारांच्या पार गेला. पहिल्यांदाच सेन्सेक्सने ५७ हजारांचा पल्ला गाठला आहे.
महिन्याभरात सेन्सेक्समध्ये ४ हजार अंकांची वाढ झाली आहे. शेअर बाजारात असाच उत्साह दिसला तर ऑक्टोबरपूर्वी सेन्सेक्स ६० हजारापर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शेअर बाजारातील वाढत्या गुंतवणुकीमुळे सेन्सेक्समध्ये वाढ झाल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. सेन्सेक्ससोबत निफ्टीतही वाढ झाली आहे. सकाळच्या सत्रात निफ्टी १७ हजारापर्यंत पोहोचला होता. निफ्टीची आतापर्यंत सर्वात मोठी वाढ आहे.
अमेरिकेच्या बाजारातून सकारात्मक संकेत, देशातील करोना रुग्णांमध्ये झालेली घट आणि वेगाने वाढणारी लसीकरण मोहीत याचे सकारात्मक परिणाम बाजारावर दिसून आले.
सुप्रसिद्ध बंगाली लेखक बुद्धदेव गुहा यांचे निधन
प्रसिद्ध बंगाली लेखक बुद्धदेव गुहा यांचे हृदयविकाराने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते.‘मधुकरी’ हे त्यांचे पुस्तक विशेष गाजले होते.
त्यांच्या कादंबऱ्यांतून निसर्गाशी सान्निध्य जाणवत असे. पूर्व भारतातील जंगलांवर त्यांचे विशेष प्रेम होते.
गुहा यांचा जन्म कोलकाता येथे झाला. त्यांचे बालपण रंगपूर व बारीसाल या पूर्व बंगालमधील भागात गेले. बालपणीच्या आठवणींचा त्यांच्यावर ठसा होता.
त्यांना आनंद पुरस्कारासह शिरोमण पुरस्कार, शरत पुरस्कार मिळाले होते. त्यांनी मधुकरी, कोएलर कच्छे, सोबीनॉय निबेदॉन ही त्यांची पुस्तके गाजली. बाबा होवा व स्वामी होवा या त्यांच्या दोन कादंबऱ्यांवर ‘डिक्शनरी’ हा चित्रपट काढण्यात आला होता.
मुलांसाठीही त्यांनी लेखन केले. त्यात रिजुदा हे त्यांचे पात्र जास्त भावले. पुस्तक मेळ्यात ते येत असत तेव्हा त्यांना पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत असे. त्यांची अनेक पुस्तके बेस्ट सेलरच्या यादीत आहेत.