⁠  ⁠

चालू घडामोडी – ३१ मार्च २०१६

Tushar Bhambare
By Tushar Bhambare 5 Min Read
5 Min Read

देश-विदेश

छत्तीसगडमध्ये स्फोटात सात जवान शहीद
छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्य़ांतर्गत येणाऱ्या मलेवाडाच्या जंगलात नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) सात जवान शहीद झाल्याची घटना बुधवारी घडली. स्फोटाची तीव्रता एवढी भीषण होती की जवानांना नेणाऱ्या वाहनाचे चार तुकडे झाले. दंतेवाडापासून १२ किमी अंतरावर मालेवाडाच्या जंगलात सीआरपीएफ व स्थानिक पोलीस संयुक्त नक्षलविरोधी अभियान राबवित होते. नक्षल शोधमोहीम आटोपल्यावर दुपारी तीनच्या सुमारास सीआरपीएफचे जवान टाटा-४०७ या वाहनाने दंतेवाडा-सुकमा मार्गाने सीआरपीएफच्या शिबिरात जात असतानाच या मार्गावर नक्षलवाद्यांनी आधीच पेरून ठेवलेल्या भूसुरुंगाचा जोरदार स्फोट झाला.

पंचायतीपासून लोकसभेपर्यंत सगळ्या निवडणुका एकाचवेळी घ्या, मोदींचा प्रस्ताव
ग्राम पंचायत, जिल्हा परिषदा, नगरपालिका, महापालिका, विधानसभा, लोकसभा अशा सतत कोणत्या ना कोणत्या निवडणुकीच्या कामात गुंतून राहिल्यामुळे कार्यकर्त्यांना सामाजिक कामे करण्यासाठी पुरेसा वेळच मिळत नाही. त्यामुळे या सर्वच निवडणुका वेगवेगळ्या वेळी घेण्याऐवजी एकाचवेळी घेण्यात याव्यात, असा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या एका कार्यक्रमात मांडला आहे. सातत्याने कोणत्यातरी निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये पक्षांचा आणि कार्यकर्त्यांचा वेळ अनावश्यक वाया जातो आणि पैसाही मोठ्या प्रमाणात खर्च होतो, याकडेही मोदी यांनी लक्ष वेधल्याचे सूत्रांकडून समजते.

बहुमत सिद्धतेच्या आदेशास स्थगिती
उत्तराखंड सरकारने आज, गुरुवारी बहुमत सिद्ध करावे या एक सदस्यीय न्यायपीठाच्या आदेशास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. बहुमत सिद्ध करण्याच्या आदेशावर केंद्राने सादर केलेल्या आव्हान याचिकेवरील सुनावणीनंतर उद्याची विधानसभेतील शक्तिपरीक्षा लांबणीवर टाकून ती ७ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात येत असल्याचा निकाल उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला आहे.

महाराष्ट्र

राज्य सरकार आणि टाटा ट्रस्टमध्ये नऊ सामंजस्य करार
दर्जेदार आरोग्य सेवा, गुणवत्तापूर्ण शिक्षण, कुपोषण निर्मुलन, स्त्री सक्षमीकरण यासह अन्य उद्दिष्टांच्या पूर्ततेतून राज्याच्या सामाजिक विकासाच्या निर्देशांकासह प्रशासनात विशेष सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र शासन व टाटा ट्रस्ट यांच्यात गुरुवारी विविध महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे केली.

‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रा’त ११ हजारावर डिजिटल शाळा
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यात आजमितीस ११ हजार २२८ डिजिटल शाळा, १४ हजार ४०९ उपक्रमशील शाळा, तर १ हजार ३६८ डिजिटल शाळा तयार झालेल्या आहेत. २०१५-१६ या आर्थिक वर्षांत इतक्या मोठय़ा प्रमाणात आयएसओ व डिजिटल शाळांची निर्मिती झाल्याने तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मुले शिकत आहेत. विशेष म्हणजे, आज विद्यार्थ्यांना पहिल्या वर्गापासूनच डिजिटल शिक्षणाचे धडे दिले जात आहेत.

क्रीडा

श्रीकांत बाद; सायना दुसऱ्या फेरीत
गतविजेती सायना नेहवाल आणि पी.व्ही. सिंधू यांनी इंडिया ओपन सीरिज बॅडमिंटन स्पध्रेत महिला गटाच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. मात्र, पुरुष गटात गतविजेत्या श्रीकांत किदम्बीला पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला. चीनच्या तिआन हुवेईने २१-१३, १७-२१, २४-२२ अशा फरकाने श्रीकांतचे आव्हान संपुष्टात आणले.

अर्थव्यवस्था

रेडीरेकनरच्या दरात वाढ
घरांच्या किमती वाढण्यास कारणीभूत ठरणाऱ्या रेडीरेकनरच्या (वार्षिक बाजार मूल्य) दरामध्ये राज्य सरकारने एक एप्रिलपासून वाढ केली आहे. मुंबईमध्ये सरासरी सात टक्के तर पुण्यामध्ये सरासरी सर्वाधिक ११ टक्क्यांनी दरात वाढ करण्यात आली आहे. ग्रामीण क्षेत्रासाठी ही वाढ आठ टक्के, नगर परिषद क्षेत्रासाठी सात टक्के आणि राज्याची एकूण सरासरी वाढ सात टक्के इतकी असणार आहे. शहरातील भागानुसारचे टक्के शुक्रवारी जाहीर करण्यात येणार आहे. नाशिकमध्ये सात टक्के, औरंगाबाद आणि नागपूरमध्ये सहा टक्क्याने रेडीरेकनरच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. मागील पाच ते सहा वर्षांत रेडीरेकनरच्या दरात मोठी वाढ झाली होती. यावर्षी मंदी आणि दुष्काळी परिस्थितीचा विचार करून तुलनेत कमी वाढ करण्यात आली असल्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत जाहीर केले.

‘निफ्टी ईटीएफ’चे व्यवहार तैवानच्या बाजारात खुले
भारतीय भांडवली बाजाराचा जगभरात वाढत्या दबदब्याचा प्रत्यय म्हणजे निफ्टी निर्देशांकावर आधारित एक्स्चेंज ट्रेडेड फंडाचे (ईटीएफ) व्यवहार आता तैवान शेअर बाजारात सुरू झाले आहेत. उल्लेखनीय म्हणजे या बाजारात व्यवहार होत असलेली ही पहिलीच भारतीय ईटीएफ योजना आहे.

जलद इंटरनेटची ग्वाही!
रिलायन्स जिओ या नव्या आर्थिक वर्षांत प्रत्यक्षात येणाऱ्या दूरसंचार सेवा कंपनीच्या जोरावर देशातील विद्यमान वेगापेक्षा तब्बल ८० टक्के अधिक वेग देण्याचे आश्वासन रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी दिले आहे. रिलायन्सची जिओ ही जगातील सर्वात मोठी ‘डिजिटल स्टार्टअप’ कंपनी ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करतानाच या उपक्रमासाठी समूहाने १.५० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचेही अंबानी यांनी बुधवारी ‘फिक्की फ्रेम्स’च्या मंचावरून जाहीर केले.

TAGGED:
Share This Article