चालू घडामोडी – ९ जून २०१६
देश-विदेश
ऑगस्टा वेस्टलॅंड आणि विजय मल्ल्या प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयची एसआयटी
# ऑगस्टा वेस्टलॅंड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणातील लाचखोरीचा आणि उद्योगपती विजय मल्ल्या यांच्याशी संबंधित पैशांची अफरातफर प्रकरणाचा तपास करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) विशेष तपास पथक (एसआयटी) गुरुवारी स्थापन केले. ऑगस्टा वेस्टलॅंड प्रकरणात इटलीतील तपास पथकाकडून मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे सीबीआयच्या पथकाने प्राथमिक तपास केला आहे. या हेलिकॉप्टर खरेदीमध्ये लाचखोरी झाल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर या व्यवहाराला तत्कालिन संरक्षण मंत्री ए. के अॅंटनी यांनी स्थगिती दिली होती. त्या पार्श्वभूमीवर लाचखोरीची रक्कम नक्की कोणाला मिळाली, याचा तपास सीबीआयकडून करण्यात येतो आहे. पुरेसे पुरावे मिळाल्यानंतर सीबीआयकडून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
क्रीडा
सायनाची विजयी सलामी
# भारताची ‘फुलराणी’ सायना नेहवालने ऑस्ट्रेलियन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी नोंदवली. किदम्बी श्रीकांत आणि समीर वर्मा यांनी विजयी आगेकूच केली. मात्र पी.व्ही. सिंधूला सलामीच्या लढतीतच अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले. सातव्या मानांकित सायनाने २०१४मध्ये या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. यंदाही या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी सायना उत्सुक आहे. सलामीच्या लढतीत तिने ऑस्ट्रेलियाच्या जॉय लाइवर २१-१०, २१-१४ असा विजय मिळवला. पुढच्या फेरीत मलेशियाच्या जिन वेई गोहशी सायनाची लढत होणार आहे.
शारापोव्हावर दोन वर्षांची बंदी
# मेलडोनियम या प्रतिबंधित उत्तेजकाच्या सेवनप्रकरणी दोषी आढळल्याने अव्वल टेनिसपटू मारिया शारापोव्हावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली. आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने यासंदर्भात घोषणा केली. दरम्यान, बंदीविरोधात शारापोव्हाने आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारी महिन्यात वर्षांतील पहिल्यावहिल्या ग्रँड स्लॅम अर्थात ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत शारापोव्हाची उत्तेजक चाचणी घेण्यात आली. मार्च महिन्यात पत्रकार परिषदेद्वारे या चाचणीत दोषी आढळल्याचे शारापोव्हाने जाहीर केले. वैद्यकीय उपचारांचा भाग म्हणून गेली दहा वर्षे मेलडोनियमचा समावेश असलेले औषध घेत होते, अशी कबुली शारापोव्हाने दिली. १ जानेवारीपासून जागतिक उत्तेजक विरोधी संघटनेने (वाडा) मेलडोनियमचा प्रतिबंधिक उत्तेजकांमध्ये समावेश केला. यासंदर्भात ‘वाडा’ने तसेच आंतरराष्ट्रीय टेनिस संघटनेने टेनिसपटूंना इमेलद्वारे माहिती दिली. हा ई-मेल पाहिला. मात्र तांत्रिक तपशील जाणून घेतला नाही असे शारापोव्हाने स्पष्ट केले.
अर्थव्यवस्था
आगामी दूरसंचार ध्वनिलहरी लिलावात वापर शुल्क ३ टक्क्य़ांवर
# आगामी वर्षांत होऊ घातलेल्या दूरसंचार ध्वनिलहरींकरिता (स्पेक्ट्रम) लिलावात, बोली लावणाऱ्या कंपन्यांच्या वार्षिक महसुलाच्या ३ टक्के प्रमाणात वापर शुल्क आकारण्याचा प्रस्ताव दूरसंचार आयोगाच्या आंतरमंत्रीस्तरीय गटाने मांडला आहे. यामुळे २३०० मेगाहर्ट्झसाठीच्या पुढील वर्षांच्या ध्वनिलहरी लिलावात भाग घेण्यास सज्ज असलेल्या तीन मोठय़ा दूरसंचार कंपन्यांचा भार २०१० मधील प्रक्रियेच्या तुलनेत तुलनेत कमी झाला आहे. २३०० मेगाहर्ट्झ बॅण्डकरिता लागू असलेल्या या लहरींसाठी २०१० मध्ये कमाल पाच टक्क्यांपर्यंत शुल्क प्रमाण निश्चित करण्यात आले होते. यंदाच्या ३ टक्के शुल्काची शिफारस खुद्द दूरसंचार आयोगानेही केली होती. सरकारने जानेवारी २०१४ मध्ये हे शुल्क सरसकट ५ टक्के करण्याचा निर्णय घेतला होता. नव्या शुल्कांतर्गत ध्वनिलहरी प्रक्रिया येत्या वर्षांत होणार आहे.
बाजार निर्देशांकांची दौड सुरूच!
# दक्षिण भारतात मान्सून धडकल्याचे भांडवली बाजाराने बुधवारच्या व्यवहाराच्या सुरुवातीला केलेले स्वागत दिवसअखेपर्यंत राहू शकले. सत्रात २७ हजारावर प्रवास करताना मुंबई निर्देशांकाने गेल्या सात महिन्यांचा वरचा टप्पा गाठला; प्रमुख निर्देशांकांचा व्यवहाराचा शेवट मात्र किरकोळ वाढीसह झाला. १०.९९ अंश वाढीसह सेन्सेक्स २७,०२०.६६ वर तर ६.६० अंश भर पडत राष्ट्रीय सेअर बाजाराचा निफ्टी ८,२७३.०५ पर्यंत गेला. पूरेशा पावसानंतर व्याजदर कपात करता येईल, या रिझव्र्ह बँक गव्हर्नरांच्या आश्वासनाची जोड केरळात बुधवारी दाखल झालेल्या पावसाच्या रुपात बाजाराला मिळाली. मुंबईसह राष्ट्रीय शेअर बाजाराचा सत्राचा प्रवासच तेजीसह झाला.
‘माइलेज चाचणी’त घोळ; सुझुकींचा मुख्याधिकारी पदाचा त्याग
# जपानची कार निर्माता सुझूकी मोटर कॉर्पोरेशनने आपल्या छोटय़ा कारची इंधन कार्यक्षमता (माइलेज) हे वाजवीपेक्षा अधिक दाखविणारी सदोष चाचणी यंत्रणा वापरात आणल्याने निर्माण झालेल्या वादंगाच्या पाश्र्वभूमीवर, कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्याधिकारी ओसामू सुझूकी यांनी त्यांच्याकडे असलेल्या मुख्याधिकारी (सीईओ) या पदापासून मुक्त होत असल्याचे बुधवारी घोषित केले. कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष व मुख्य तंत्रज्ञान अधिकारी ओसामू होंडा यांना निवृत्ती तर या प्रकरणाशी संबंधित कंपनीच्या संचालकांवर वेतन कपातीच्या शिक्षेलाही सामोरे जावे लागणार आहे.