⁠  ⁠

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भन्ते प्रज्ञानंद

Saurabh Puranik
By Saurabh Puranik 1 Min Read
1 Min Read

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग करत 14 ऑक्टोबर 1956 लाखो दलित अनुयायांसह बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. त्यांना धम्मदीक्षा देणाऱ्या पाच भन्तेंच्या पथकात प्रज्ञानंद हे होते. प्रज्ञानंद हे मूळचे श्रीलंकेचे होते. 18 डिसेंबर 1927 ला कॅण्डी येथे जन्मलेल्या या भन्तेंचे प्राथमिक शिक्षण श्रीलंकेतच झाले. शिक्षण घेत असतानाच त्यांना धर्मप्रसाराचे महत्त्व वाटू लागले. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे संस्थापक अनागरिक धम्मपाल यांनी त्यांना श्रीलंकेतून भारतात आणले. येथे आल्यावर त्यांचा संपर्क उत्तर प्रदेशातील लालकुंवा येथील बुद्ध विहाराचे संस्थापक भन्ते बोधानंद यांच्याशी झाला. उर्वरित शिक्षण उत्तर प्रदेशात पूर्ण करत त्यांनी त्रिपिटीकाचार्य ही पदवी मिळवली. 1942 ला त्यांनी धम्मदीक्षा घेत बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी स्वत:ला वाहून घेतले. श्रामणेर दीक्षेनंतर त्यांना प्रज्ञानंद हे नाव देण्यात आले.डॉ. आंबेडकर नाशिकजवळील येवल्याला गेले असताना तेथे त्यांची बोधानंद व प्रज्ञानंदांशी भेट झाली. बोधानंदांनी प्रज्ञानंदांना आंबेडकरांच्या सोबत दिले. नागपूरच्या सोहळ्यात महास्थवीर चंद्रमणी यांच्या नेतृत्वातील पथकात प्रज्ञानंद सहभागी झाले होते. प्रज्ञानंद यांनी अलीगढ येथे अडीच लाख लोकांना दीक्षा दिली. बौद्ध धर्माची महती सांगणाऱ्या पाली भाषेत असलेल्या अनेक ग्रंथांचा त्यांनी हिंदीत अनुवाद केला.

Share This Article