⁠  ⁠

हायपरलूप आधारित प्रवासी ट्रॅफिक सिस्टीम सामंजस्य करार (MoU)

Saurabh Puranik
By Saurabh Puranik 3 Min Read
3 Min Read

राज्य शासनाच्या वतीने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीएने) काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये वर्ज़िन हायपरलूप वन (लॉस एंजेलिस) यांचे सोबत सामंजस्य करार (MoU) केला.

            या सामंजस्य कराराव्दारे विशेषतः पुणे – मुंबई विभागातील  मार्गांचे पूर्व व्यवहार्यता अभ्यास अहवाल (Pre-feasibility study) तयार करून हायपरलूप आधारित प्रवासी ट्रॅफिक सिस्टीम कार्यान्वित करण्याचा मानस आहे.  पीएमआरडीए व हायपरलूप वन या कंपनीच्या संयुक्त विद्यमाने प्रार्थमिक अभ्यास (Preliminary study) केला जाईल. सामंजस्य करारानंतर ६ आठवडयाच्या कालावधीत प्रवासी वाहतूक आणि अभ्यासासाठी इतर संबंधित डेटा प्राप्त करण्यासाठी पीएमआरडीए राज्य सरकारच्या तसेच महापालिकांच्या सर्व विभागांशी समन्वय साधेल. प्राथमिक अभ्यास (Preliminary study) स्वीकृतीसाठी  महाराष्ट्र शासनाकडे सादर केला जाईल.

            हायपरलूप हा वाहतूकीचा एक नवीन प्रकार असून कमी दाबाच्या निर्वात पोकळीमधून इलेक्ट्रो – चुंबकीय प्रणोदकांमधून प्रवाशांची वाहतूक केली जाते. अत्यंत जलद व थेट अशा वाहतूकीचा प्रकार असून ६७० MPH (१०८० KPH) असा वेग असेल. हायपरलूप ही कार्यक्षम, सुरक्षित व विश्वासार्ह वाहतूक प्रणाली असून हायस्पीड रेल सिस्टम्सच्या २/३ इतक्या किमतीत विकसित करण्यात येईल. जागतिक स्तरावर हायपरलूप चाचणी टप्प्यात (Trial stage) आहे. हायपरलूपने  उत्तर लास वेगास, एनव्ही येथे जगातील पहिल्या पूर्ण-स्तरच्या हायपरलोप चाचणी साइट विकसित केली आहे. सध्या, हायपरलोप आधारित ट्रांजिट प्रोजेक्ट्स नेदरलॅंड्समध्ये (शिफोल विमानतळ कनेक्टर), अबु धाबी ते दुबई (इंटरसिटी कनेक्टर) आणि स्टॉकहोम ते हेलसिंकी (रिजनल नेटवर्क) येथे चालू आहेत. भारतामध्ये महाराष्ट्र व आंध्रप्रदेश यांच्या सयुंक्त विद्यमाने हायपरलूप तंत्रज्ञानासाठी सामंजस्य करार करून विजयवाडा आणि अमरावती या शहरांसाठी प्राथमिक अभ्यास (Preliminary study) तयार करण्यात आला आहे. या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, “हायपरलूप यंत्रणा ही २१  व्या शतकातील नागरिकांच्या वाढत्या मागणीसाठी विकसित होणाऱ्या द्रूतगतीच्या वाहतूक यंत्रणाचे भविष्य आहे. जलद सार्वजनिक वाहतुकीचे व्यवहार्य साधन बनण्यासाठी उच्च घनतेची वाहतूक आवश्यक आहे,  जी पुणे आणि मुंबई शहरात उपलब्ध आहे. हाइपरलूप तंत्रज्ञानाने मुंबई आणि पुणे विभागातील महानगर प्रदेशांना जोडल्यास प्रवास वेळ २०  मिनिटांपेक्षा कमी होईल. या प्रकल्पामुळे मुंबई – पुणे क्षेत्रातील २  कोटीपेक्षा जास्त लोकसंख्येला फायदा होईल.” महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी पीएमआरडीएचे किरण गित्ते, व व्हर्जीन हायपरलूप वनचे वरिष्ठ उपाध्यक्ष निक अर्ले यांनी सामंजस्य करारावर (MoU)स्वाक्षऱ्या केल्या.

काय आहे हायपरलूप?
एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी रस्त्याच्या लगत किंवा रस्त्यापेक्षा उंच तसेच अगदी समुद्रातूनही मोठ्या वाहिन्या उभ्या केल्या जातात. या वाहिन्यांमधून ओर्का पॉड नावाचे वाहन प्रवास करते. कॅप्सूलच्या आकाराचे हे डबे असतात. हे डबे अंतराळ यानाच्या तंत्रज्ञानानुसार प्रवास करणार आहेत. यामुळे याचा वेग सुमारे १००० किमी प्रति तास इतका असणार आहे.

TAGGED:
Share This Article