एमपीएससी : मुख्य परीक्षा पेपर दोन (राज्यव्यवस्था)
भारतीय राज्यघटना आणि राज्यव्यवस्था या उपघटकाच्या तयारीबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.
भारताचे संविधान
घटनेच्या सरनाम्यातील तत्त्वज्ञान, हेतू व्यवस्थित समजावून घेऊन या आधारे पुढील अभ्यास करणे आवश्यक आहे. घटनेतील मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्ये, राज्याची नीतीनिर्देशक तत्त्वे याबाबतची कलमे परिपूर्ण करायची आहेत. केंद्र राज्य संबंधांमध्ये प्रशासकीय, आर्थिक, न्यायिक, इतर बाबतीत केंद्र शासन व राज्य शासन यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी कशा प्रकारे झाली आहे, त्याबाबतची कलमे नीट समजून घ्यावीत. याबाबत घटनेच्या सातव्या अनुसूचीचा संदर्भ घ्यावा.
घटनात्मक पदे अभ्यासताना संबंधित कलम, कार्ये, अधिकार, नेमणुकीची पद्धत, पदावरून काढण्याची पद्धत, पदावरील व्यक्ती हे मुद्दे पाहावेत. केंद्रीय व महाराष्ट्र लोकसेवा आयोग याबाबतची कलमे, त्यांची रचना, कार्ये, सध्याचे सदस्य व अध्यक्ष, त्यांची वाटचाल हे मुद्दे पाहावेत. प्रशासकीय प्रशिक्षण संस्थांच्या स्थापनेमागची पाश्र्वभूमी, कायद, रचना, बोधचिन्ह, बोधवाक्य, कार्ये, त्यांचे प्रमुख, त्यांच्या वाटचालीचे टप्पे इ. माहिती असणे आवश्यक आहे. प्रशासकीय न्यायाधिकरणांचा अभ्यासही आवश्यक आहे.
घटनादुरुस्ती प्रक्रिया व महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या लक्षात घ्यायच्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे घटनेचा अर्थ विषद करणारे महत्त्वाचे निर्णय माहीत असावेत.
* राजकीय यंत्रणा – कार्यकारी घटक
यामध्ये प्रत्यक्ष प्रशासन व शासन धोरणांची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा व त्यासंबंधी विविध घटकांचा समावेश होतो. केंद्र व राज्य शासनाची निवड, रचना, कार्ये, अधिकार, कार्यपद्धती या बाबी तथ्यात्मक आणि संकल्पनात्मक आहेत. या व्यवस्थित समजून घ्याव्यात. लोकसभा/राज्यसभा/विधानमंडळे यांचे कामकाज, त्यांच्या समित्या, रचना, कार्ये, अधिकार यांचा बारकाईने अभ्यास आवश्यक आहे. त्यासाठी त्यांची कामकाज नियमावली पाहणे आवश्यक आहे. न्यायपालिकेची उतरंड, नेमणुका, महाभियोग, विशेषाधिकार समजून घ्यावेत. महाराष्ट्र राज्याची निर्मिती आणि पुनर्रचनेचा भाग पेपर १ मधून अभ्यासावा. राज्याची विविध संचालनालये तसेच प्रशिक्षण संस्थांची स्थापना, उद्देश, त्यांचे कार्य, रचना, बोधचिन्ह/वाक्य माहीत असावेत.
* प्रशासन
प्रशासनामध्ये पहिला घटक आहे राज्य प्रशासन. यामध्ये मंत्रालयीन कामकाजाची कल्पना असणे गरजेचे आहे.
स्थानिक शासनामध्ये ७३वी व ७४वी घटनादुरुस्त्यांमधील तरतुदी, स्थानिक स्वराज्य संस्थाकडे सोपवलेले विषय, सुरू केलेल्या समित्या/ आयोग यांचा अभ्यास आवश्यक आहे. या समित्यांच्या शिफारशी, त्या अनुषंगाने घेतलेले निर्णय व त्यांची अंमलबजावणी यांचा अभ्यास करायला हवा. पंचायत राज संस्थांचे मूल्यमापन करण्यासाठी स्थापन केलेल्या समित्यांच्या अहवालातील ठळक मुद्दे विचारात घ्यावेत. तसेच पदाधिकाऱ्यांचे अधिकार इत्यादीबाबत राज्य शासनाकडून घेण्यात येणारे निर्णय माहीत असावेत.
जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांचे मतदारसंघ, सदस्य, पदाधिकारी, अधिकारी, समित्या इत्यादींच्या नोट्स तुलनात्मक सारणी पद्धतीमध्ये काढता येतील. जिल्हास्तर ते पंचायत स्तरापर्यंत महसूल, विकास व पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांची उतरंड व त्यांचे अधिकार, कार्य, नेमणूक, राजीनामा, पदावरून काढून टाकणे या बाबी समजून घ्याव्यात.
नागरी स्थानिक शासनातील महानगरपालिका, नगर परिषद व कटक मंडळे यांचे स्वरूप, रचना, कार्ये, अधिकार व जबाबदाऱ्या या अनुषंगाने अभ्यास करावा. नागरी स्थानिक शासन प्रकारासाठीचे निकष समजून घ्यायला हवेत. यामध्ये मुंबईचा नगरपाल (शेरीफ) यांचे विशिष्ट स्थान, अधिकार व कर्तव्ये यांचा स्वतंत्र आढावा घ्यावा.
* राजकीय पक्ष व दबाव गट
राजकीय पक्ष व दबाव गट यांच्याबाबत राष्ट्रीय पक्षांची स्थापना, स्थापनेमागील कारणे, अजेंडा, निवडणूक चिन्ह, त्यांच्या वाटचालीतील ठळक टप्पे व मुद्दे, महत्त्वाचे नेते इत्यादी. मुद्दे पाहावेत. प्रादेशिक पक्षांचा अभ्यास हा महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षांवर फोकस असलेला पण राष्ट्रीय पातळीवर चच्रेत असणाऱ्या इतर राज्यांतील प्रादेशिक पक्षांचाही अभ्यास आहे हे गृहीत धरावे. याबाबत अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पक्षांतर बंदीबाबतच्या तरतुदी व घटनादुरुस्त्या.
* निवडणूक प्रक्रिया
निवडणूक प्रक्रियेमध्ये आयोगांची रचना, कार्ये, अधिकार आयोगाने घेतलेले महत्त्वाचे निर्णय, नियम व त्यांचे यशापयश यांचा अभ्यास आवश्यक आहे. या वस्तुनिष्ठ बाबी अगदी व्यवस्थित अभ्यासा. मतदानाचा काळ, मतदारावर प्रभाव टाकणारे घटक, आयोगासमोरची समस्या या मुद्दय़ांबाबत विश्लेषणात्मक अभ्यास गरजेचा आहे.
*प्रसारमाध्यमे
प्रसारमाध्यमे या घटकामधील Press Council of Ind ची रचना, कार्ये, council’ ने जाहीर केलेली नितितत्त्वे (code of conduct) अभ्यासणे आवश्यक आहे. महिलांची माध्यमातील प्रतिमा निर्मिती (portrayal) हा भाग विश्लेषणात्मक व मूल्यात्मक (ethical/moral) आहे. याबाबत वृत्तपत्रे, टीव्ही चॅनल्सवरील गांभीर्यपूर्ण चर्चा, इंटरनेटवरील लेख यांचा अभ्यास करून स्वत:चे चिंतन करणे आवश्यक आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय तसेच चालू घडामोडी पाहाणे आवश्यक आहे.
*शिक्षण व्यवस्था
शिक्षण व्यवस्था घटकामध्ये घटनेतील शिक्षणाबाबतची मार्गदर्शक तत्त्वे, मूलभूत कर्तव्ये त्यांमागील उद्देश व त्यांचे निहितार्थ व्यवस्थित समजून घ्यावेत. सर्व शिक्षा अभियान व माध्यान्ह भोजन योजना तसेच राज्य शासनाच्या शिक्षणविषयक विविध योजना यांच्या तरतुदी माहीत असायला हव्यात.
– फारूक नाईकवाडे