⁠  ⁠

सरपंच ते फौजदार, पहिल्याच प्रयत्नात पीएसआय पदाला गवसणी

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

MPSC Success Story ओमनगर येथील रहिवासी माजी सरपंच श्रीनाथ गंगाधरराव गिराम यांनी फौजदार पदाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. लोकसेवा महाराष्ट्र आयोगामार्फत घेण्यात आलेल्या संयुक्त परीक्षा २०२० चा निकाल दि. ४ जुलै मंगळवार रोजी जाहीर झाला. पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत श्रीनाथ गंगाधरराव गिराम यांनी राज्यातून ६४ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला.

मूळगाव पोरवड तालुका, जिल्हा – परभणी येथील श्रीनाथ गिराम हे लहानपणापासूनच शिक्षणासाठी आपले ताई व भावजी यांच्या सोबत गंगाखेड येथे राहत आलेले आहेत. सन २०१६ साली श्रीनाथ गिराम यांनी आपले पदवीचे शिक्षण संत जनाबाई शिक्षण संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय गंगाखेड येथे पूर्ण करून स्पर्धा परीक्षेच्या तयारीचा अभ्यास करण्यासाठी पुणे गाठले.

दीड वर्ष स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून आपल्या अभ्यासाचा उपयोग आपल्या गावाच्या विकासासाठी करता येईल या उद्देशाने त्यांनी २०१७-२०१८ साली पोरवड येथील ग्रामपंचायत निवडणूक लढविली व सरपंच पदावर निवडून आले. आपल्या सरपंच पदाचे कार्यकाळात त्यांनी अनेक विकासाच्या योजना गावात राबविल्या सोबतच संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानचा ग्रामपंचायत साठीचा जिल्ह्यातून दुसरा क्रमांक पटकावला.

सरपंच पदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर श्रीनाथ गिराम यांनी हॉटेल व्यवसायात उतरण्याचे ठरविले. तसेच त्यानंतर मेडिकल दुकान हा व्यवसाय देखील यशस्वीरित्या चालू केला. परंतू, त्यांच्यातील अभ्यासू वृत्ती त्यांना स्वस्त बसू देत नसल्याने तसेच कोरोना महामारीच्या काळात हॉटेल व्यवसायथंडावल्याने त्यांनी अभ्यासासाठी परत पुणे गाठायचे ठरवत पुन्हा स्पर्धा परीक्षेचा संघर्ष सुरू केला.

२०२० च्या पोलिस उपनिरीक्षक पदाची जाहिरात आली तिची पूर्व परीक्षा सप्टेंबर २०२१ मध्ये ते उत्तीर्ण होवून मुख्य परीक्षेसाठी पात्र झाले परत एक वर्ष अभ्यास करून सप्टेंबर २०२२ मध्ये झालेली मुख्य परीक्षा ते उत्तीर्ण झाले व मार्च २०२३ रोजी झालेल्या शारीरिक चाचणी व मुलाखतीमध्ये ही उत्तीर्ण झाले त्याचा अंतिम निकाल दि. ४ जुलै रोजी जाहीर झाला त्यात ते राज्यात ६४ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले.

Share This Article