⁠
Inspirational

छोट्या हॉटेलमधील वेटर ते पोलिस ; वाचा आकाशच्या यशाची कहाणी !

कोणत्याही परिस्थितीत जिद्दीने अभ्यास करून मिळवलेले यश हे कौतुकास नेहमीच पात्र ठरते. आकाश कापुरे हा धुळे जिल्ह्यातील दोंडाई या गावातील मुलगा. त्याचे वडील किशोर तोताराम कापुरे हे गवंडी काम करत असताना त्यांचा अपघात झाला आणि फार कमी वयात वडील गेले… त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी ही आईवर आली. आई मोलमजुरी करून घर चालवायची.

त्यामुळे आकाशने देखील गवंड्याच्या हाताखाली मजूर म्हणूनही काम केले. मिरची पथारीवर मिरच्या खुडण्याचे काम केले. नंदुरबार येथे एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केले. नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात होत असलेल्या लग्नांमध्ये केटरिंगचे काम करत होता.आकाशने बारावीपर्यंत शिक्षण झाले. त्याने दोंडाईचा येथील एका कॉलेजमध्ये सिव्हिल डिप्लोमाला प्रवेश घेतला. मात्र त्या ठिकाणी लागणाऱ्या शैक्षणिक साहित्यासाठी पैसे नसल्याने त्याला शिक्षण अर्ध्यावरच सोडावे लागले. पुढे त्याने स्व – कमाई करून शिक्षण घेतले.

त्याची ही जिद्द बघून नंदुरबार येथील भामरे अकॅडमीचे संचालक युवराज भामरे यांनी दत्तक घेतले. त्याची राहायची, खाण्याची व्यवस्था केली. तसेच क्लाससाठी एक रुपयाही घेतला नाही. त्याने देखील अहोरात्र अभ्यास केला आणि मैदानी सराव देखील केला.घरच्या परिस्थितीची जाणीव असल्याने मिळालेल्या पैशातून पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत होता.साधारणपणे २०१४ मध्ये तो पहिल्यांदा पोलीस भरतीत सहभागी झाला होता. मात्र त्यात अपयशी ठरला. हीच जिद्द उराशी बाळगून त्याने पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली.

त्यानंतर दहा वर्षांच्या प्रयत्नांनी त्याला यश आलं आणि २०२४ मध्ये नंदुरबार येथे झालेल्या पोलीस भरतीत त्याची निवड झाली. त्याची ही निवड होणे हा सगळ्यांसाठी एक सण आहे आणि कुटुंबाला भक्कम आधार तयार झाला आहे ‌.

Related Articles

Back to top button