पुणे- मुलगी शिक्षण घेऊन पुढे काय करणार, त्यापेक्षा तिने घरी बसून घरातील कामे शिकावीत आणि लग्न करून सासरी जावे, अशी मानसिकता अनेक ठिकाणी पाहण्यास मिळते. अशाच परिस्थितीत बारावीनंतर कुटुंबीयांनी शिक्षण थांबवल्याने चार वर्षे घरी बसलेली मुलगी पुन्हा जिद्दीने शिक्षणास सुरुवात करते आणि पदवीधर होऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा देत मुलींमध्ये राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवते. ही किमया साधली आहे पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडेजवळील माळवाडी गावातील स्वाती दाभाडे या तरुणीने. स्वातीने नुकत्याच झालेल्या परीक्षेत उपजिल्हाधिकारी पद मिळवले आहे.
स्वातीचे वडील किसन भगवान दाभाडे व आई लक्ष्मी किसन दाभाडे हे अल्पशिक्षित असून शेती करतात. तर, तिची बहीण सुजाता मुळीक हिचे बारावीपर्यंतच शिक्षण झाले असून भाऊ विशालने आयटीआय करत खासगी कंपनीत नोकरी सुरू केली आहे. पहिली ते चाैथीपर्यंतचे शिक्षण स्वातीने जिल्हा परिषदेच्या शाळेत घेतले व त्यानंतर तळेगाव येथील रामभाऊ परुळेकर विद्यालयात तिने दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर अकरावी आणि बारावी इंद्रायणी महाविद्यालयात विज्ञान शाखेतून पूर्ण केली व नेहमीप्रमाणे वर्गात प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान मिळवला. मात्र, त्यानंतर तिच्या वडिलांनी मोठी मुलगी सुजाता हिला बारावीपर्यंतचे शिक्षण दिल्याने स्वातीलादेखील पुढील शिक्षण न देता घरी बसवण्यात आले. यादरम्यान, घरीच स्वातीने लहान मुलांचे क्लास घेणे सुरू करून कुटुंबीयांना हातभार लावण्यास सुरुवात केली. मात्र, तिच्यासोबतच्या इतर मैत्रिणी शिक्षण घेऊन पुढे जात असल्याचे पाहून घरी बसून आपण काय करतो, असा प्रश्न तिला पडला. त्यामुळे वडिलांच्या पुन्हा मागे लागून तिने पुन्हा शिक्षण सुरू केले. मात्र, गावातील महाविद्यालयात विज्ञान शाखेचा पुढील अभ्यासक्रम नसल्याने तिने कॉमर्सला प्रवेश घेत बीकॉम पदवी संपादन केली व कुटुंबातील पहिली पदवीधर झाली. दरम्यान, बीकॉमच्या परीक्षेतही टॉपर आल्याने वडिलांच्या मित्राने मुलीचे शिक्षण पुढे सुरू ठेवण्यास सांगितले व त्यांची मानसिकता तयार केली. जीएसटी अधिकारी सुनील काशिद यांचे व्याख्यान ऐकल्यानंतर स्वाती स्पर्धा परीक्षेकडे वळली. त्यानंतर तिने यश प्राप्त केले.