लोकसभा निवडणुकीमुळे केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे आयोजित नागरी सेवा परीक्षा (CSE) प्रिलिम आणि भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन्ही परीक्षा 26 मे 2024 रोजी होणार होत्या. UPSC ने अधिकृत नोटीस जारी करून ही माहिती दिली आहे.
केंद्रीय लोकसेवा पूर्व परीक्षा आता 16 जून रोजी पार पडणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसेवा आयोगाने हा निर्णय घेतला आहे. यूपीएससीची 26 मे रोजी होणारी परीक्षा देखील पुढे ढकलली आहे. निवडणुकीमुळे परीक्षेच्या नियोजनावर आणि विद्यार्थ्यांवर परिणाम होऊ नये यासाठी आयोगाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 14 फेब्रुवारी ते 6 मार्च 2024 या कालावधीत पूर्ण झाली होती.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने निवेदनात म्हटलं की, सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळापत्रकामुळे आयोगाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. UPSC भारतीय वन सेवा परीक्षा-2024 साठी स्क्रीनिंग चाचणी देखील आयोजित करते. जी 26 मे ते 16 जून दरम्यान होणार होती. ती देखील पुढे ढकलण्यात आली आहे.
गेल्या महिन्यात प्रसिद्ध झालेल्या UPSC जाहिरातीनुसार, भरतीमध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत एकूण 1206 रिक्त पदांची भरती करायची आहे. यापैकी 1056 पदे भारतीय प्रशासकीय सेवा/IAS साठी आरक्षित आहेत तर 150 पदे भारतीय वन सेवेसाठी (IFS) राखीव आहेत. 19 एप्रिलपासून लोकसभा निवडणुका सात टप्प्यांत होणार आहेत. निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे.