⁠  ⁠

चालू घडामोडी : ०९ ऑक्टोबर २०१९

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

जेम्स पीबल्स, मिशेल मेयर व दिदियर क्वेलॉझ यांचा सन्मान

महाविस्फोटापासून आतापर्यंत विश्वाची उत्क्रांत होत गेलेली अवस्था व विश्वातील पृथ्वीचे स्थान या विषयावरील सैद्धांतिक संशोधनासाठी जेम्स पीबल्स यांना तर बाह्य़ग्रहाच्या शोधासाठी मिशेल मेयर व दिदियर क्वेलॉझ यांना यंदाच्या वर्षीचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
विश्वाचा वेध घेणारे हे अतिशय क्रांतिकारी संशोधन असल्याचे नोबेल निवड समितीने या तिघांच्या कार्याचा गौरव करताना म्हटले आहे. विश्वाच्या उत्क्रांत अवस्थांचा अभ्यास पीबल्स यांनी केला असून मेयर व क्वेलॉझ यांनी १९९५ मध्ये दूरवर सूर्यासारख्या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या ग्रहाचा शोध लावला होता त्यानंतर आतापर्यंत चार हजारहून अधिक बाह्य़ग्रहांचा शोध लावण्यात यश आले आहे.
रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेने मंगळवारी भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली असून नऊ दशलक्ष क्रोनर म्हणजे नऊ लाख १८ हजार अमेरिकी डॉलर्सच्या रकमेतील निम्मा वाटा जेम्स पीबल्स यांना मिळणार असून इतर दोघांना उर्वरित रक्कम सारखी वाटून दिली जाणार आहे. जेम्स पीबल्स हे न्यूजर्सी येथील प्रिन्स्टन विद्यपीठात प्राध्यापक असून त्यांनी विशची उत्क्रांती व पृथ्वीचे विश्वातील स्थान यावर संशोधन केले.
मिशेल मेयर व दिदियर क्वेलोझ यांना पृथ्वीपासून पन्नास प्रकाशवर्षे दूर असलेल्या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या ५१ पेगासी बी या ग्रहाचा शोध लावल्याबद्दल नोबेल जाहीर करण्यात आले. या दोघांनी पहिल्या बाह्य़ग्रहाचा शोध लावला.

बालाकोट हवाई हल्ल्यातील स्क्वॉड्रन पदकांनी सन्मानित

बालाकोट हल्ल्यात सहभागी असलेले दोन स्क्वॉड्रन आणि भारतीय हवाई दलाच्या एका युनिटला मंगळवारी येथे पदके प्रदान करून सन्मानित करण्यात आले. भारतीय हवाई दल दिनाच्या निमित्ताने हवाई दलप्रमुख आरकेएस भदौरिया यांनी ५१ स्क्वॉड्रन आणि ६०१ एक युनिट व नऊ स्क्वॉड्रन यांना बालाकोटमध्ये करण्यात आलेल्या हल्ल्यातील सहभागाबद्दल पदके प्रदान करून सन्मानित केले.
बालाकोट हल्ल्यातील विंग कमांडर अभिनंदन वर्धमान आणि अन्य वैमानिकांनी या वेळी हवाई कसरतींमध्ये भाग घेतला. पाकिस्तानसमवेत झालेल्या लढाईच्या वेळी वर्धमान यांनी शत्रुपक्षाचे विमान पाडले होते.

भारताला मिळालं पहिलं राफेल लढाऊ विमान

भारताला पहिले राफेल लढाऊ विमान मिळाले आहे. विजयादशमी आणि एअरफोर्स डेनिमित्त संरक्षणमंत्री राजनाथ सिंह फ्रान्सच्या बोर्डेक्स येथील डॅसॉल्ट प्लांटमध्ये पोहोचले व तेथून विमानं ताब्यात घेतले.
राफेल हे आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त एक लढाऊ विमान आहे. राफेल यांच्या हस्तांतरण सोहळ्यात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, हा एक ऐतिहासिक दिवस आहे.

सरकार उभारणार 1 हजार 400 किलोमीटरची ‘ग्रीन वॉल’ ऑफ इंडिया

केंद्र सरकारने देशातील पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि हरित क्षेत्र वाढवण्यासाठी 1 हजार 400 किलोमीटर लांबीची ‘ग्रीन वॉल’ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. आफ्रिकेत सेनेगल पासून जिबूतीपर्यंत तयार करण्यात आलेल्या हरित पट्ट्याच्या धर्तीवर गुजरातपासून दिल्ली-हरियाणाच्या सीमेपर्यंत ‘ग्रीन वॉल ऑफ इंडिया’ उभारण्यात येणार आहे. ही ग्रीन वॉल लांबीला 1 हजार 400 किलोमीटर तर रूंदीला 5 किलोमीटर इतकी असणार आहे.
भारत सरकार आपली ही कल्पना 2030 पर्यंत पूर्ण करण्याच्या दृष्टीने सध्या काम करत आहे. या अंतर्गत 26 दशलक्ष हेक्टर जमिन प्रदूषणमुक्त करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे.

Share This Article