⁠  ⁠

चालू घडामोडी – ११ ऑगस्ट २०१६

Tushar Bhambare
By Tushar Bhambare 6 Min Read
6 Min Read

देश-विदेश

बराक ओबामा हे इसिसचे संस्थापक: ट्रम्प
# न्युयॉर्क – अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा हे इसिस या दहशतवादी संघटनेचे संस्थापक असल्याची टीका अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या स्पर्धेतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. यापूर्वी ट्रम्प यांनी “इसिस‘च्या संस्थापक असल्याचा आरोप त्यांच्या प्रतिस्पर्धी हिलरी क्‍लिंटन यांच्यावर केला होता. आता त्यांनी नव्याने अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा यांना इसिसचे संस्थापक ठरविले आहे. बुधवारी रात्री फ्लोरिडा येथे एका प्रचारसभेला संबोधित करताना त्यांनी हा आरोप केला आहे. विशेष म्हणजे यावेळी बोलताना त्यांनी ओबामा यांचे ‘बराक हुसेन ओबामा‘ असे संपूर्ण नाव घेतले. संपूर्ण भाषणादरम्यान ट्रम्प यांनी “ते इसिसचे संस्थापक आहेत‘ असा उल्लेख तीन वेळा केला.

कुदनकुलम अणुऊर्जा प्रकल्प – १ देशाला समर्पित
# पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी बुधवारी संयुक्तपणे १००० मेगावॅट क्षमतेचा कुदनकुलम अणुऊर्जा प्रकल्प-१ देशाला समर्पित केला. हा जगातील सर्वात सुरक्षित प्रकल्प असल्याची ग्वाहीही या वेळी या नेत्यांनी दिली. कुदनकुलन – १ हा भारत-रशियाचा संयुक्त प्रकल्प असून भारतात स्वच्छ ऊर्जानिर्मिती वाढविण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे, असे नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतून या कार्यक्रमात सहभागी होताना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जाहीर केले. रशियासमवेत असलेली आपली मैत्री अबाधित आहे आणि आम्ही एकत्रितपणे हा प्रकल्प समर्पित करीत आहोत हे योग्यच आहे. हरित वाढीसाठी भागीदारीचा मार्ग सुरू करण्याची आमची बांधिलकी आहे याचे संकेतही यातून मिळाले आहेत, असे मोदी म्हणाले.

प्रसुती रजेचा कालावधी वाढवणारे विधेयक राज्यसभेत मंजूर
# सरकारी आणि खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना आता २६ आठवड्यांपर्यंतची पगारी रजा मिळणार आहे. यासंबधीचे विधेयक गुरुवारी राज्यसभेत मंजूर करण्यात आले आहे. याआधी प्रसुती रजेचा कालावधी हा केवळ १२ आठवड्यांचा होता. गुरूवारी प्रसुती रजा विधेयक राज्यसभेत सादर करण्यात आले यावेळी या विधेयकात रजेचा कालावधी १२ आठवडयांवरुन २६ आठवडयांच्या करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. यामुळे सरकारी आणि खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. सरकारी नोकरीत काम करणाऱ्या महिलांना ही सुविधा याआधी होतीच. परंतु, आता खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनादेखील याचा फायदा होणार आहे. या विधेयकामध्ये सरोगसी मातांचा उल्लेख करण्यात आलेला नाही. जर एखादी महिला कर्मचारी बाळास दत्तक घेत असेल, तर तिला १६ आठवड्यांची पगारी रजा दिली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती.

निर्भया निधीसाठी केंद्राकडून २०० कोटी
# महिला आणि बालसुरक्षेसाठी असणाऱ्या निर्भया निधीसाठी केंद्र सरकारने २०० कोटी रुपये दिल्याची माहिती राज्यसभेत देण्यात आली. राज्यमंत्री हंसराज आहिर यांनी ही माहिती दिली. देशभरातील सर्व राज्यांतील अत्याचाराला बळी पडलेल्या महिला व मुलांना या योजनेनुसार भरपाई देण्यात येईल, असेही ते म्हणाले. या योजनेवर प्रत्येक राज्याचे नियंत्रण असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारने निर्भया निधी योजनेची पुनर्रचना करताना तिचे सेंट्रल व्हिक्टीम कॉम्पेन्सेशन फंड (सीव्हीसीएफ) असे नामकरण केले आणि २०० कोटींचा निधी देऊन महिला आणि मुलांसाठी असलेल्या या योजनेला बळ दिल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आल्याचेही आहेर म्हणाले. केंद्राकडून देण्यात आलेल्या या निधीचे राज्यनिहाय वाटप करण्यात येणार आहे. ही योजना अधिक प्रभावीपणे राबविता यावी यासाठी राज्य सरकारला प्रोत्साहन देण्यात येत असल्याचेही केंद्राकडून सांगण्यात आले.

महाराष्ट्र

राज्यात प्रथमच सोलापुरात ५४ विधवांना रिक्षापरवाने
# मरण पावलेल्या रिक्षाचालकांच्या विधवा पत्नींच्या नावे रिक्षा परवाना नोंद करण्याचा प्रयोग सोलापूरच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने हाती घेत आतापर्यंत ५४ विधवांना रिक्षा परवाने दिले आहेत. राज्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याचा दावा केला जात आहे. सोलापूर शहरात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे परवानाधारक रिक्षांची संख्या ८५९३ इतकी आहे. शहराची लोकसंख्या सुमारे दहा लाखांपर्यंत आहे. लोकसंख्येच्या तुलनेत रिक्षांची संख्या अपुरी आहे. रिक्षांची संख्या वाढविण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. या पाश्र्वभूमीवर एकीकडे अधिकृत परवानाधारक रिक्षांची संख्या कमी असताना दुसरीकडे अनधिकृत व आयुष्मान संपलेल्या रिक्षांची संख्या वाढली आहे. यापूर्वी २००७ साली दीड हजार रिक्षांचे वाढीव परवाने वितरित केले गेले होते. दरम्यान, काही रिक्षापरवानाधारक मरण पावले. यातच शहरातील पालिका परिवहन उपक्रमाची प्रतिकूल स्थिती पाहता रिक्षा परवान्यांची संख्या वाढविण्याची मागणी पुन्हा पुढे आली. त्याचा विचार करून सोलापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी परिवहन प्राधिकरणाच्या जिल्हास्तरीय बैठकीत रिक्षा परवाना नूतनीकरणाच्या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेतला.

राज्य कर्मचाऱ्यांचा आज ‘चेतना दिन’
# राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या एकजुटीला गुरुवारी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने गुरुवारी सुवर्णमहोत्सवी चेतना दिन साजरा करण्यात येणार आहे. हेच औचित्य साधून आगामी वर्ष हे संघर्ष वर्ष म्हणून पाळण्यात येणार आहे. संघटनेचे राज्याचे अध्यक्ष योगिराज खोंडे यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले, की पूर्वी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनभत्ते व सेवासुविधा मिळत नव्हत्या. त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष होता. तो लक्षात घेऊन दि. २१ मे १९६६ला नगर जिल्हय़ातच मुळा धरणाच्या कार्यक्षेत्रावर कर्मचारी व मजुरांची मोठी सभा झाली होती. या सभेत ठरल्यानुसार या मागण्यांसाठी दि. ११ ऑगस्ट १९६६ला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी सामुदायिक रजा टाकून राज्यभर आंदोलन छेडले. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे हे तसे पहिले संघटित आंदोलन होते, त्या वेळी ते राज्यभर कमालीचे यशस्वी झाले. हे आंदोलन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या एकजुटीची खऱ्या अर्थाने नांदी ठरली.

[edsanimate_start entry_animation_type= “fadeIn” entry_delay= “0” entry_duration= “1” entry_timing= “linear” exit_animation_type= “” exit_delay= “” exit_duration= “” exit_timing= “” animation_repeat= “infinite” keep= “yes” animate_on= “load” scroll_offset= “” custom_css_class= “”]स्पर्धा परीक्षांचे अपडेट आपल्या मोबाईलवर मोफत मिळवा! अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.[edsanimate_end]

TAGGED:
Share This Article