⁠  ⁠

Current Affairs 2 & 3 March 2018

Saurabh Puranik
By Saurabh Puranik 6 Min Read
6 Min Read

1) भारतीय भाषा संवर्धन समितीच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर कंबार

भारतीय भाषांचे संवर्धन करणा-या साहित्य अकादमी या संस्थेच्या अध्यक्षपदी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक चंद्रशेखर कंबार यांची निवड झाली. पंचवीस वर्षांनंतर अकादमीच्या अध्यक्षपदी पुन्हा एक कन्नड साहित्यिक विराजमान झाला आहे. ओडिया लेखिका प्रतिभा राय आणि ‘कोसला’ कार महाराष्ट्रीयन साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांचा पराभव करीत त्यांनी अध्यक्षपदावर आपले नाव कोरले तर उपाध्यक्षपदी हिंदी कवी माधव कौशिक निवडून आले. या निवडणूकीत चंद्रशेखर कंबार यांनी 56 मतांनी आपले स्थान बळकट केले तर ओडिया लेखिका प्रतिभा राय यांना 29 मते आणि भालचंद्र नेमाडे यांना केवळ 4 च मते पडली. विनायक कृष्णा गोकाक (1983) आणि यू.आर अनंतमूर्ती (1993) यांच्यानंतर तिस-या कन्नड साहित्यिकाची अकादमीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

2) मुंबईतील एक हजार हरवलेल्या मुलांना त्यांच्या कुटुंबीयांना सोपविणाऱ्या आरपीएफच्या महिला उप निरीक्षक रेखा मिश्रा
मुंबईतील एक हजार हरवलेल्या मुलांना त्यांच्या कुटुंबीयांना सोपविणाऱ्या आरपीएफच्या महिला उप निरीक्षक रेखा मिश्रा यांना केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाने पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. रेखा शर्मा मूळच्या उत्तरप्रदेशातील अलाहाबादच्या आहेत. त्या २०११ च्या बॅचच्या आरपीएफ उप निरीक्षक आहेत. प्रशिक्षणानंतर त्या २०१४ पासून नियमित सेवेत आहेत. डिसेंबर २०१४ मध्ये त्यांची नियुक्ती मुंबईत झाली. एक वर्ष त्या महिला सुरक्षा दलात होत्या. त्यानंतर २०१६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर त्यांना नियुक्त करण्यात आले. या ठिकाणी सेवा बजावत असताना त्यांनी आतायर्पंत ९५३ हरवलेल्या मुलांना त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत सुखरुप पोहचविले आहे.

3) व्हीएतनामचे राष्ट्रपती त्रान दाई क्वांग भारत दौऱ्यांवर

व्हीएतनामचे राष्ट्रपती त्रान दाई क्वांग तीन दिवसांच्या भारत दौऱ्यांवर आहेत. ४ मार्चपर्यंत ते भारतामध्ये असतील. आशिया-पॅसिफिक प्रदेशात चीनचा वाढता प्रभाव आणि चीनचे वाढते दबावाचे राजकारण लक्षात घेता या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे. या दौऱ्यामध्ये त्रान दाई क्वांग भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा करतील तसेच ते भारतातील उद्योजकांचीही भेट घेतील. क्वांग यांच्या १८ जणांच्या शिष्टमंडळामध्ये उद्योजक आणि कलाकारांचा समावेश आहे. तसेच त्यांच्या पक्षाचे काही नेते व मंत्रीही असतील. राष्ट्रपती क्वांग आपल्या भारतभेटीमध्ये बिहारमधील बोधगया या पवित्र तीर्थक्षेत्रालाही भेट देतील. चीनच्या वाढत्या कारवायांना ब्रुनेई, तैवान, मलेशिया, फिलिपाइन्स, व्हीएतनामनेही विरोध केला आहे. नरेंद्र मोदी यांनी व्हीएतनामला २०१६ साली भेट दिली होती. या भेटीच्यावेळेस दोन्ही देशांमध्ये माहिती-तंत्रज्ञान, अवकाशविज्ञान, दुहेरी करआकारणी अशा विविध विषयांवर १२ करार करण्यात आले होते. २०१७ साली या दोन्ही देशांच्या राजनयिक संबंधांना २५ वर्षे पूर्ण झाली.

4)रिझर्व्ह बँकेचे लोकपालामार्फत ६,९४५ कोटी रुपयांच्या ठेवींना संरक्षण

बँकिंग क्षेत्रात घोटाळे बाहेर येत असताना आता बिगर बँकिंग वित्तीय संस्थांमधील ठेवीदारांना रिझर्व्ह बँकेने लोकपालामार्फत संरक्षण देऊ केले आहे. यामुळे देशातील २.३७ कोटी ठेवीदार सुरक्षित झाले आहेत. एनपीए व कर्ज बुडव्यांचे घोटाळे यामुळे देशातील बँकिंग क्षेत्र हादरले आहे. सहकारी बँकांची स्थितीही फार चांगली नाही. यामुळेच गुंतवणूकदार झपाट्याने बिगर बँकिंग वित्त संस्थांकडे (एनबीएफसी) वळत असताना तेथेही भविष्यात फसवणुकीचे प्रकार होण्याची भीती होती. या एनबीएफसींना लोकपालाच्या कक्षेत आणण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. एनबीएफसीकडून ठेवीदारांची फसवणूक झाल्यास रिझर्व्ह बँक लोकपालाची नियुक्ती करेल. बँकेतील महाव्यवस्थापक दर्जाचा अधिकारी ‘लोकपाल’ या नात्याने पूर्ण तपास करेल. त्याची नियुक्ती कमाल तीन वर्षाची असेल. लोकपालाची नियुक्ती प्रारंभी केवळ मुंबई, दिल्ली, कोलकाता व चेन्नई या महानगरांत असेल. एनबीएफसीत घोटाळा झाल्यास कुठल्या लोकपाल कार्यालयात ते प्रकरण वर्ग करायचे हा निर्णय रिझर्व्ह बँकेकडून घेतला जाणार आहे. फसवणूक झालेली व्यक्ती स्वत: याबाबत रिझर्व्ह बँकेकडे तक्रार करू शकेल. एनबीएफसींचे विविध १२ प्रकार असतात. यापैकी केवळ ठेवी स्वीकारणाºया संस्थांवर सुरुवातीला रिझर्व्ह बँकेची करडी नजर असेल. अशा संस्थांना लोकपालाच्या कक्षेत आणले आहे. पहिल्या टप्प्यातील यशानंतर ही कक्षा विस्तारली जाईल.

5) करदात्यामध्ये महाराष्ट्र दुसरा

जानेवारी 2018 या महिन्यात जीएसटीमधून 86, 318 कोटी रुपये सरकारकडे जमा झाले आहेत. डिसेंबर 2017 च्या तुलनेत ही आकडेवारी आधिक आहे. जानेवारीमध्ये 57.78 लाख जीएसटीआर 3 बी रिटर्न झाली. जी एकूण करदात्यांच्या 69 टक्के आहे. सरकारने जीएसटीच्या या आकड्यावरीसोबतच प्रत्येक राज्याच्या करदात्याचा डेटा जाहीर केला आहे. जीएसटी कर भरण्यामध्ये पंजाब, महाराष्ट्र आणि गुजरात सर्वात पुढे आहेत. 25 फेब्रुवारी 2018 पर्यंत 1.03 कोटी टॅक्सपेअर्सने जीएसटीची नोंदणी केली आहे. जवजवळ 17.65 लाख उद्योगपतींनी कंपोजिशन डिलर साठी रजिस्ट्रेशन केलं आहे. 25 फेब्रुवारी 2018 पर्यंत 16.42 लाख उद्योगपत्तींनी कंम्पोजिशन स्कीमची निवड केली आहे. केंद्र सरकारनं जीएसटीमधून जमा झालेल्या आकडेवारीसह प्रत्येक राज्याचा टॅक्सपेअर्सचा (करदाते) डेटा जाहीर केला आहे. करदात्यामध्ये महाराष्ट्र सर्वात अव्वल आहे. मात्र कर भऱणाऱ्यामध्ये पंजाबनं बाजी मारली आहे. जीएसटी कर भरणाऱ्यामध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. पंजाब आणि महाराष्ट्रामधून 70 टक्केंपेक्षा आधिक जीएसटी कर भरला जातो.

6) त्रिपुरा,नागालँडमध्ये कमळ; मेघालयात काँग्रेस आघाडीवर

ईशान्य भारतातील त्रिपुरा, नागालँड आणि मिझोरम या राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. त्रिपुरातील २५ वर्षापासूनची डाव्यांची सत्ता उलथवून भाजपने ऐतिहासिक विजय मिळविला आहे. त्रिपुरात अवघे दीड टक्के मते मिळविलेल्या भाजपनं आता जोरदार मुसंडी मारत ४१ टक्के मते मिळविली आहेत. त्रिपुरात ‘चलो पलटए’ हा भाजपचा नारा होता. भाजप आघाडीने बहुमताचा आकडा पार करत ४० जागां तर २५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या सीपीएमला अवघ्या १८ जागां मिळाल्या आहेत. त्रिपुरामध्ये 18 फेब्रुवारीला मतदान झाले होते, तर नागालँड व मेघालयात 27 फेब्रुवारीला मतदानाची प्रक्रिया पार पडली होती. तिन्ही विधानसभांमध्ये प्रत्येकी 60 जागा आहेत. मात्र निवडणुकीत मतदान मात्र 59-59 जागांसाठी झाले.

त्रिपुरा :
भाजप: ४० जागा
माकप: १८ जागा
इतर: ०१ जागा

नागालँड :
भाजप: ३१ जागा
एनपीएफ: २४ जागा
काँग्रेस: ०१ जागा
इतर: ०४ जागा

मेघालय :
भाजप: ०४ जागा
एनपीपी: १६ जागा
काँग्रेस : २२ जागा
इतर: १७ जागा

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Share This Article