⁠  ⁠

चालू घडामोडी – २३ ऑगस्ट २०१६

Tushar Bhambare
By Tushar Bhambare 6 Min Read
6 Min Read

देश-विदेश

दक्षिण कोरिया व अमेरिका यांच्या संयुक्त लष्करी कवायती सुरू
# दक्षिण कोरिया व अमेरिका यांच्यातील संयुक्त लष्करी कवायती उत्तर कोरियांच्या धमक्यांना न जुमानता सुरू झाल्या आहेत. उत्तर कोरियाने या कवायतींचा निषेध केला आहे. उलची फ्रीडम ड्रिल असे या कवायतींचे नामकरण केले असून त्यात उत्तर कोरियाकडून अणुहल्ला झाल्यास नेमकी कशी रणनीती असावी याचाही समावेश आहे. या कवायती संगणक सादृश्यीकरणाच्या माध्यमातील असून त्यात ५० हजार कोरियन व २५ हजार अमेरिकी सैनिक सहभागी आहेत. या दोन्ही देशांच्या कवायतीमुळे उत्तर कोरियात नेहमी संताप व्यक्त होत असतो. यावर्षी दोन देशांमध्ये सरहद्दीवरील तणाव वाढलेला असताना कवायती होत आहेत. अमेरिका व दक्षिण कोरिया यांच्या संयुक्त लष्करी कवायती संरक्षणात्मक पातळीवर असल्या तरी उत्तर कोरियाने मात्र त्या प्रक्षोभक असल्याचे म्हटले आहे.

जगातील श्रीमंत देशांमध्ये भारत सातवा
# नवी दिल्ली : जगभरातील श्रीमंत देशांमध्ये भारताने सातवा क्रमांक पटकावला असून, अमेरिका यात आघाडीवर आहे. भारतातील व्यक्तिगत संपत्ती 5 हजार 600 अब्ज डॉलर गेली आहे. “न्यू वर्ल्ड वेल्थ‘ने आज व्यक्तिगत संपत्तीच्या आधारे श्रीमंत देशांचा अहवाल जाहीर केला. यातील यादीत भारत सातव्या स्थानी आहे. कॅनडातील व्यक्तिगत संपत्ती 4 हजार 700 अब्ज डॉलर, ऑस्ट्रेलियातील 4 हजार 500 अब्ज डॉलर, इटलीतील 4 हजार 400 अब्ज डॉलर असून, भारत त्यांच्यापुढे आहे. एकूण व्यक्तिगत संपत्तीचा विचार करता अमेरिका आघाडीवर असून, अमेरिकेतील व्यक्तिगत संपत्ती 48 हजार 900 अब्ज डॉलर आहे. चीन आणि जपान दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर असून, त्यांची संपत्ती अनुक्रमे 17 हजार 400 अब्ज डॉलर आणि 15 हजार 100 अब्ज डॉलर आहे. पहिल्या दहा देशांमध्ये ब्रिटन 9 हजार 200 अब्ज डॉलर संपत्तीसह चौथ्या स्थानी आहे. जर्मनी 9 हजार 100 अब्ज डॉलर संपत्तीसह पाचव्या आणि फ्रान्स 6 हजार 600 अब्ज डॉलर संपत्तीसह सहाव्या स्थानी आहे.

[edsanimate_start entry_animation_type= “fadeIn” entry_delay= “0” entry_duration= “1” entry_timing= “linear” exit_animation_type= “” exit_delay= “” exit_duration= “” exit_timing= “” animation_repeat= “infinite” keep= “yes” animate_on= “load” scroll_offset= “” custom_css_class= “”]स्पर्धा परीक्षांचे अपडेट आपल्या मोबाईलवर मोफत मिळवा! अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.[edsanimate_end]

राष्ट्रवादी काँग्रेस ‘राष्ट्रीय’च राहणार
# लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्याने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमाविण्याची टांगती तलवार राष्ट्रवादी काँग्रेसवरून दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकाच निवडणुकीतील यशापयशाऐवजी सलग दोन निवडणुकांमधील कामगिरीवर आधारित दर्जा ठरविण्याचा निर्णय सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला. त्याचा फायदा राष्ट्रवादीबरोबरच लोकसभेत सुमार कामगिरी करणाऱ्या बहुजन समाज पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्षालाही मिळणार आहे. राज्य पक्ष म्हणून असाच फायदा कदाचित मनसेलाही होऊ शकतो.

क्रीडा

अश्विनने सचिन, सेहवागचा विक्रम मोडला!
# वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका भारतीय संघाने २-० अशी जिंकली. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन सामने अनिर्णीत राहिले, तर दोन सामने भारताने जिंकले. चौथी कसोटीत पूर्णपणे पावसाचा खेळ पाहायला मिळाला. या कसोटी मालिकेत भारताचा फिरकीपटू आर.अश्विन याने अष्टपैलू कामगिरी केली आणि एक नवा विक्रम देखील प्रस्थापित केला. चौथी कसोटी अनिर्णीत घोषित करण्यात आल्यानंतर पारितोषिक वितरण समारंभात फिरकीपटू अश्विन याला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत अश्विनचा हा सहावा मालिकावीराचा किताब ठरला. सहाव्यांदा मालिकावीराचा पुरस्कार जिंकून अश्विनने माजी क्रिकेटवीर सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांचा विक्रम मोडीत काढला आहे. याआधी सचिन आणि सेहवाग यांना पाच वेळा मालिकावीरचा बहुमान मिळाला होता.

सानिया महिला दुहेरीच्या अव्वल स्थानी
# भारताच्या सानिया मिर्झाने बाबरेरा स्ट्रायकोव्हाच्या साथीने खेळताना सिनसिनाटी चषक टेनिस स्पध्रेच्या अंतिम फेरीत पूर्वाश्रमीची जोडीदार मार्टिना हिंगीस आणि कोको व्हँडेवेघेचा ७-५, ६-४ असा पराभव करीत विजेतेपद काबीज केले. या जेतेपदासह सानियाने डब्ल्यूटीएच्या जागतिक क्रमवारीत महिला दुहेरी विभागात एकटीने अग्रस्थान पटकावले आहे. सानिया हिंगीसच्या साथीने याआधी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर होती. मात्र ऑलिम्पिकच्या कालखंडात हिंगीसने सानियासोबत न खेळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे २९ वर्षीय सानियाला एकटीलाच हे स्थान टिकवता आले आहे. सानिया-हिंगीस जोडीने महिला दुहेरीत आपले वर्चस्व प्रस्थापित करताना तीन ग्रँड स्लॅमसह एकंदर १४ विजेतेपदे जिंकली होती. रिओमध्ये हिंगीसने टायमा बॅकसिन्स्कीसोबत खेळताना स्वित्र्झलडला रौप्यपदक जिंकून दिले होते.

अर्थव्यवस्था

भारताचा विकासदर 7.8% पर्यंत जाण्याचा अंदाज
# नवी दिल्ली : चांगल्या मॉन्सूनमुळे चालू आर्थिक वर्षात भारताचा विकासदर 7.8 टक्‍क्‍यांवर पोचेल, असा सुधारित अंदाज इंडियन रेटिंग अँड रिसर्च (इंड-रा) या पतमानांकन संस्थेने मंगळवारी वर्तविला. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर निर्माण झालेल्या आशादायी वातावरणानंतरही अर्थव्यवस्थेने वेग घेतला नसल्याचे संस्थेने म्हटले आहे. “इंड-रा‘ने अर्थव्यवस्थेचा आढावा अहवाल जाहीर केला आहे. चालू आर्थिक वर्षात देशांतर्गत एकूण उत्पादन (जीडीपी) 7.7 टक्‍क्‍यांवर जाईल, असा अंदाज आधी संस्थेने व्यक्त केला होता. आता यात सुधारणा करून ते 7.8 टक्के राहील, असे म्हटले आहे. याला मॉन्सूनची चांगली स्थिती आणि खरीप हंगामातील पेरणी या गोष्टी कारणीभूत ठरल्या आहेत. खरिपाची पेरणी सरासरी क्षेत्रापेक्षा 5.7 टक्के अधिक आहे. यामुळे कृषी उत्पादन 3 टक्‍क्‍यांनी वाढण्याचा अंदाज आहे. आधी ते 2.8 टक्के वाढेल, असा अंदाज होता. मॉन्सून आणि खरीप हंगाम या दोन्ही सकारात्मक बाबींमुळे एकूणच जीडीपीमध्ये वाढ होईल, असे संस्थेने नमूद केले आहे.

[edsanimate_start entry_animation_type= “fadeIn” entry_delay= “0” entry_duration= “1” entry_timing= “linear” exit_animation_type= “” exit_delay= “” exit_duration= “” exit_timing= “” animation_repeat= “infinite” keep= “yes” animate_on= “load” scroll_offset= “” custom_css_class= “”]स्पर्धा परीक्षांचे अपडेट आपल्या मोबाईलवर मोफत मिळवा! अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.[edsanimate_end]

TAGGED:
Share This Article