⁠  ⁠

Current Affairs 23 February 2018

Saurabh Puranik
By Saurabh Puranik 5 Min Read
5 Min Read

1) करप्शन इंडेक्समध्ये भारत घसरून 81 व्या क्रमांकावर

ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने २०१७ साठी जगभरातील देशांचा करप्शन इंडेक्स जाहीर केला आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात भारताचे स्थान दोन टप्प्यांनी घसरून १८३ देशांत ८१ व्या स्थानी आले आहे. २०१६मध्ये भारत ७९व्या स्थानी होता. ही क्रमवारी देताना ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने ० (सर्वात भ्रष्ट) ते १०० (भ्रष्टाचारमुक्त) असे अंक दिले आहेत. या आधारे १८३ देशांतील सरकारी संस्था व कंपन्यांतील भ्रष्टाचाराचा आढावा घेतला. भारताला यंदा २०१६ सारखेच ४० अंक मिळाले आहेत. एखाद्या देशाचा जेवढा अधिक स्कोअर तेवढा तो अधिक भ्रष्ट असा निकष यात आहे. बर्लिनस्थित ही भ्रष्टाचारविरोधी संस्था जागतिक बँक, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम व इतर संस्थांच्या आकडेवारीच्या आधारे जगभरातील सरकारी संस्थांतील भ्रष्टाचाराचा आढावा घेते. भ्रष्टाचार, माध्यम स्वातंत्र्यातही भारत कमकुवत देशांच्या यादीत : ट्रान्सपरन्सीने भारताला आशिया-प्रशांत क्षेत्रात भ्रष्टाचार व माध्यम स्वातंत्र्याच्या अनुषंगाने सर्वात कमकुवत देशांच्या यादीत समाविष्ट केले आहे.

2) भारतात गरीब-श्रीमंतांमधील दरी वाढली

भारतातील असमानता सलग तीन दशकांपासून वाढत आहे. देशातील अब्जाधीशांची संपत्ती देशाच्या जीडीपीच्या १५ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांच्याकडील संपत्ती जीडीपीच्या १० टक्क्यांच्या बरोबरीत होती. ऑक्सफॅम इंडियाने गुरुवारी जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. भारताचा जीडीपी २.६ लाख कोटी डॉलर म्हणजेच सुमारे १६८ लाख कोटी रुपयांचा आहे. २०१७ मध्ये येथील अब्जाधीशांची संख्या (६,५०० कोटींपेक्षा जास्त नेटवर्थ असणारे) १०१ होती. भारत जगातील सर्वाधिक असमानता असलेला देश असल्याचेही इंडिया इनइक्वॅलिटीज अहवाल २०१८ मध्ये नमूद करण्यात आले आहे. येथील असमानता उत्पन्न, खर्च आणि संपत्ती अशा अनेक बाबतीत असल्याचे अहवालाचे लेखक प्रो. हिमांशू यांनी म्हटले आहे. या अहवालानुसार २०१७ मध्ये भारतात जेवढी संपत्ती उत्पादित झाली त्यातील ७३ टक्के भाग अति श्रीमंतांकडे गेला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत तेजीने वाढ झाली असल्याने मोजक्या लोकांच्या संपत्तीतही तेजीने वाढ झाली आहे.

3) लिम्का बुकमध्ये आजीबाईंची शाळा

पाटीपुस्तक देणाऱ्या मुरबाडमधील आजीबाईंची शाळा या अभिनव उपक्रमाची दखल लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे. फांगणे गावात मोतिराम गणपत दलाल चॅरिटेबल ट्रस्ट संचालित आजीबाईंच्या शाळेच्या यशामध्ये पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे. परंपरेनुसार लवकर झालेले लग्न, दुर्बल आर्थिक परिस्थिती, संसाराच्या जबाबदाऱ्या आणि मुलांचे संगोपन अशा अनेक कारणांमुळे गांवांतील महिला लहान वयातच शिक्षणाकडे पाठ फिरवतात. मात्र मुरबाड तालुक्यातील फांगणे गावातील जिल्हा परिषदेचे शिक्षक असलेल्या योगेंद्र बांगर यांनी महिलांना पुन्हा एकदा शिक्षणाचे स्वप्न दाखवले. साठी ओलांडलेल्या महिलांसाठी सुरू केलेल्या आजीबाईंच्या शाळेत सुरुवातीला कमी प्रतिसाद मिळाला असला तरी अवघ्या काही दिवसांतच वर्ग हाऊसफुल झाला. या शाळेत गावातील ६० ते ९० वयाच्या सर्व आजी शिक्षणाचे धडे गिरवित आहेत.

4) मधु मंगेश कर्णिक यांना विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार

राज्य सरकारतर्फे दिला जाणारा कविवर्य विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना जाहीर झाला आहे. तर कविवर्य मंगेश पाडगांवकर भाषासंवर्धक पुरस्कार मराठी विज्ञान परिषद या संस्थेला प्रदान करण्यात येणार आहे. राज्याचे सांस्कृतिक व मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत मराठी भाषा विभागाचे सर्वोच्च पुरस्कार, मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाची माहिती दिली. कविवर्य विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना , श्री.पु. भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार पुण्यातील वरदा प्रकाशनाला, डॉ. अशोक केळकर भाषाअभ्यासक पुरस्कार अविनाश बिनीवाले यांना आणि कविवर्य मंगेश पाडगांवकर भाषासंवर्धक पुरस्कार मराठी विज्ञान परिषद या संस्थेला प्रदान करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या सोहळ्यादरम्यान रवींद्र साठे, उत्तरा केळकर यांच्यासह अनेक प्रथितयश कलाकार ‘मराठीच्या पोतडीतून’ हा मराठी भाषेची वैशिष्ट्ये सांगणारा कार्यक्रम सादर करणार आहेत. २७ फेब्रुवारी रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात हा कार्यक्रम पार पडेल.

5) सर्वाधिक सायबर हल्ले होणाऱ्या देशांच्या यादीत भारत सातव्या स्थानी

सायबर हल्ले होणाऱ्या देशांच्या यादीमध्ये भारत सातव्या स्थानी आहे. अकमै टेक्नोलॉजीने नुकताच जाहीर केलेल्या ‘स्टेट ऑफ द इंटरनेट’ अहवालामध्ये सायबर सुरक्षा आणि डेटा चोरीसंदर्भातील आकडेवारी जाहीर केली आहे. मागील वर्षी भारतात झालेल्या एकूण सायबर हल्ल्यांपैकी ४० टक्के म्हणजेच ५३ हजारहून अधिक सायबर हल्ले हे आर्थिक क्षेत्रांशीसंबंधीत बेवसाईट्स आणि अॅप्लिकेशन्सवर झाले आहेत. फिशिंग, वेब हॅक्स आणि मालवेअर प्रकारातील सायबर हल्ल्यांच्या प्रमाणात २०१७ सालात वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. आणि सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे ही वाढ आर्थिक व्यवहारांसंदर्भातील सेवांशी संबंधित आहे. त्यामुळेच भारताने सायबर सुरक्षेच्या दृष्टीने इंटरनेट वापरासंदर्भातील कठोर नियम, त्यासंदर्भातील पायाभूत सुविधा आणि त्यासंदर्भातील अॅक्शन प्लॅनवर लवकरात लवकर काम करुन डिजीटल व्यवहार अधिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न करायला हवा असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Share This Article