⁠  ⁠

Current Affairs 23 March 2018

Saurabh Puranik
By Saurabh Puranik 5 Min Read
5 Min Read

1) 129 वर्षांत 19व्या वेळी बदलणार आयफेल टॉवरचा रंग

पॅरिस शहर प्रशासन आणि फ्रान्स सरकारने टॉवरला लाल रंग देण्याची योजना बनवली आहे. १८८९ मध्ये जेव्हा आयफेल टॉवरची निर्मिती झाली तेव्हा याचा रंग लाल होता. इतिहासाला उजाळा देण्यासाठी पुन्हा एकदा लाल रंग दिला जाईल. टॉवरच्या १२९ वर्षांच्या इतिहासात १९ व्या वेळी टॉवरचा रंग बदलला जाईल. रंगकाम करण्यासाठी जवळपास तीन वर्षांचा वेळ लागेल. यात ६० हजार किलो रंग लागण्याचा अंदाज आहे. ३२४ मीटर उंच आयफेल टॉवरला १८८९ मध्ये वास्तुविशारद गुस्ताव आयफेलने बनवले होते. आतापर्यंत १८ वेळा टॉवरला रंग देण्यात आला. दर ७ ते ८ वर्षांनी पूर्ण टॉवरला रंग देण्यात येतो. एका वेळी २५ लोकांची टीम रंग देत असते.

2) साखर उत्पादनात महाराष्ट्र प्रथम

देशात सुरू झालेल्या ५२३ साखर कारखान्यांपैकी १०६ साखर कारखाने बंद झाले आहेत. एकूणच साखर उत्पादन २५८ लाख ६० हजार मे.टन इतके झाले आहे. साखर उत्पादनात महाराष्ट्र प्रथम, उत्तर प्रदेश दुस-या तर कर्नाटक तिस-या क्रमांकावर आहे.

देशातील १२ राज्यात प्रामुख्याने साखर उत्पादन घेतले जाते. यावर्षी महाराष्ट्रातील सर्वाधिक १८७ साखर कारखान्यांनी ऊस गाळप हंगाम घेतला होता. त्यानंतर उत्तरप्रदेशमधील ११९ व कर्नाटकमधील ६५ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला आहे. सुरू झालेल्या एकूण ५२३ साखर कारखान्यांपैकी १५ मार्चपर्यंत १०६ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम बंद केला आहे. कारखाने बंद होण्यात कर्नाटक आघाडीवर असून सर्वाधिक ४८ कारखाने १५ मार्चपर्यंत बंद झाल्याची नोंद आहे.

त्यानंतर महाराष्ट्रतील ३१ कारखाने तर उत्तर प्रदेशातील ५ कारखान्यांचा पट्टा पडला आहे. तामिळनाडूतील सुरू झालेल्या ३६ पैकी ९, आंध्रप्रदेश-तेलंगणामधील सुरू झालेल्या २५ पैकी ७, मध्यप्रदेशातील २२ पैकी एक, गुजरातमधील १७ पैकी २, उत्तराखंडमधील सुरू झालेल्या ७ पैकी एक कारखाना बंद झाला आहे. उर्वरित साखर कारखान्यांचा हंगाम सुरू आहे. सुरू झालेले बिहारमधील सर्वच १०, पंजाबमधील १६, हरियाणातील १४, राजस्थानमधील एक कारखाना सुरू आहे.

देशभरात सुरू झालेल्या साखर कारखान्यातून १५ मार्चपर्यंत २५८ लाख मे.टन साखर तयार झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून ९३.८३ लाख मे.टन, उत्तरप्रदेशात ८४.३९ लाख मे.टन, कर्नाटकमध्ये ३५.१० लाख मे.टन, गुजरातमध्ये ९.१० लाख मे.टन, आंध्रप्रदेश- तेलंगणामध्ये ६.४० लाख मे.टन, पंजाब व बिहारमध्ये प्रत्येकी ५.८० लाख मे.टन, हरियाणामध्ये ५.२५ लाख मे.टन, मध्यप्रदेशमध्ये ४.५० लाख मे.टन, तामिळनाडूमध्ये ४.२० लाख मे.टन, उत्तराखंडमध्ये ३.२५ लाख मे.टन साखर उत्पादन झाले आहे.

3) फणस बनले केरळचे राज्यफळ

फणसाला केरळ राज्याने बुधवारी राज्यफळाचा मान बहाल केला. राज्याचे कृषिमंत्री व्ही. एस. सुनीलकुमार यांनी विधानसभेत ही घोषणा केली. केरळमध्ये दरवर्षी ३० कोटींहून अधिक फणसांचे उत्पादन होते. देशभरात वर्षाला सुमारे १९०० हजार टन फणसाचे उत्पादन होत असले तरी त्यापैकी सुमारे ३० टक्के फणस ग्राहकापर्यंत पोहोचण्याआधीच सडून जातात. म्हणूनच फणसावर प्रक्रिया करून टिकाऊ उत्पादने तयार करण्यास खूप वाव आहे. २० राज्यांमध्ये फणस पिकत असले तरी त्रिपुराचा क्रमांक त्यात पहिला आहे. त्याखालोखाल ओरिसा, आसाम, प. बंगाल, कर्नाटक, केरळ, छत्तीसगढ, झारखंड व मध्य प्रदेश ही सर्वाधिक उत्पादन करणारी राज्ये आहेत. उत्पादनाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात १५वा क्रमांक लागतो.

4) सौदीच्या आकाशातून इस्राइलला गेले भारताचे पहिले विमान

एअर इंडियाचे विमान पहिल्यांदाच सौदी अरेबियाच्या आकाशातून प्रवास करत इस्त्राइलमधील बेन गुरियन एअरपोर्टवर पोहोचले. सौदी अरेबियाने इस्राइलला जाणाऱ्या विमानांना आपल्या आकाशाचा वापर करू देण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारतातून इस्राइलला जाणाऱ्या आणि इस्राइलहून भारताकडे जाणाऱ्या विमानांना आपल्या हवाई हद्दीतून प्रवास करण्याची परवानगी देण्याचे संकेत सौदी अरेबियाने हल्लीच दिले होते. एअर इंडियाचे 139 विमान तब्बल साडे सात तासांचा प्रवास करून गुरुवारी बेन गुरियन विमानतळावर पोहोचले. सौदी अरेबियाच्या धोरणात आलेला हा मोठा बदल आहे. इराण आणि सौदी अरेबियामध्ये असलेले तणावपूर्ण संबंध हे सौदीच्या इस्राइलकडे झुकण्याचे कारण मानले जात आहे.

5) डिश टीव्ही-व्हिडीओकॉनचे डी२एच विलीनीकरण

डिश टीव्ही व व्हिडीओकॉन डी२एचचे एकत्रीकरण अखेर पूर्ण झाले आहे. या रूपाने २.८० कोटी ग्राहकसंख्येसह देशातील सर्वात मोठी डीटीएच ही कंपनी अस्तित्वात आली आहे.
उभय कंपन्यांच्या संचालक मंडळाने याबाबतच्या विलीनीकरणाला नोव्हेंबर २०१६ मध्ये प्रथम मंजुरी दिली होती. यानंतर केंद्रीय माहिती प्रसारण खाते, राष्ट्रीय कंपनी कायदे लवाद तसेच भारतीय स्पर्धा आयोगाच्या परवानगीची प्रक्रियाही या दोन्ही कंपन्यांना करावी लागली. याबाबतच्या प्रस्तावाला भांडवली बाजार नियामक यंत्रणा सेबी तसेच मुंबई व राष्ट्रीय शेअर बाजाराची परवानगी यापूर्वीच मिळाली आहे.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Share This Article