MPSC Success Story: दिवसा काम, रात्री करायचा अभ्यास, कठोर परिश्रमानंतर शेतकऱ्याचा पोरगा बनला PSI

MPSC परीक्षेची लाखो विद्यार्थी तयारी करीत असतात. यात अधिकारी होण्याचे स्वप्न प्रत्येकजण पाहत असतो. मात्र ते सहजासहजी होत नाही. त्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात. दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या मुलाने अत्यंत मेहनत आणि सातत्याच्या बळावर पोलीस उपनिरीक्षक म्हणजे पीएसआयच्या पदाला गवसणी घातली आहे.

बंडू जनार्दन भालेकर (Bandu Bhalerao) असे या 31 वर्षीय तरुणाचे नाव असून ते अमरावती जिल्ह्यातील जळका शहापूर गावातील रहिवासी आहे. तो शेतकरी कुटुंबातून येतो. घरची परिस्थिती साधारण असल्याने त्याने महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच नोकरीसाठी प्रयत्न केले. 2013 पासून यवतमाळ जिल्हा परिषदेत परिचर म्हणून मिळाली.

यानंतर त्याने नेर पंचायत समितीअंतर्गत शिरसगावच्या पीएचसीमध्ये 2018 पर्यंत काम केले. मात्र, हेच काम करत असतानाही त्याने आपल्याला याच पदावर न राहता काहीतरी विशेष करायचं, त्यासाठी वाटेल ती मेहनत घ्यायची हा ध्यास घेतला. यातूनच त्याने आपल्या उरात पीएसआय होण्याचे स्वप्न पाहिले.

दरम्यान, 2018 नंतर त्याने नेर पंचायत समिती कार्यालयातच बदली मिळविली. याठिकाणी त्याला एक महिना रात्रपाळी तर एक महिना दिवसाची ड्युटी असे त्याच्या कामाचे स्वरुप होते.

यावेळी रात्रपाळीत तो पंचायत समितीमध्ये बसून स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास सुरू केला. तर दिवसपाळीत नेर नगरपालिकेच्या लायब्ररीमध्ये अभ्यास करायचा. अभ्यास करताना त्याने एक-दोनदा महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एमपीएससीची परिक्षा दिली. मात्र, अवघ्या काही गुणांनी त्याला अपयश आले. मात्र, तरीसुद्धा न हारता, न खचता त्याने पुन्हा सप्टेंबर 2022 मध्ये परीक्षा दिली आणि त्यात त्याने यश मिळवले. यात त्याला 400 पैकी 264 गुण मिळवले.

मुख्य परीक्षा पास झाल्यावर लवकरच त्याला फिजिकल टेस्ट आणि मुलाखतीला सामोरे जावे लागणार आहे. मात्र, कटऑफ हा 237 गुणांचा आहे. त्यामुळे त्याला यापेक्षा बरेच जास्त गुण आहेत. त्यामुळे त्याची पीएसआय म्हणून आपली निवड होणे, ही केवळ औपचारिकता असल्याचे मत बंडूने एका वृत्ताशी बोलताना व्यक्त केले.

पीएसआय होण्याच्या स्वप्नाने झपाटलेल्या बंडूचे 2021 मध्ये लग्न झाले. तेव्हा पॉलिटेक्निक करीत असलेल्या पत्नी प्रतीक्षाने त्याला अभ्यासासाठी भरपूर साथ दिली. दरम्यान, बंडू हा सध्या फिजिकल टेस्टसाठी तो नेरमधील नेहरू महाविद्यालयाच्या परिसरात दररोज सराव करीत आहे.

Leave a Comment