चालू घडामोडी – २३ सप्टेंबर २०१९

ऊर्जा सुरक्षा क्षेत्रातील सहकार्यावर चर्चा

भारत आणि अमेरिकने ऊर्जा सुरक्षा क्षेत्रात परस्पर सहकार्याने काम करण्याची आवश्यकता आणि गुंतवणूक संधींचा विस्तार यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेतील ऊर्जा कंपन्यांच्या प्रमुखांशी चर्चा केली.

गोलमेज परिषदेत १७ कंपन्यांचा सहभाग होता. या ऊर्जा कंपन्यांचे प्रकल्प दीडशे देशांत असून त्यांची उलाढाल एक लाख कोटी डॉलर्सची आहे, या ऊर्जा कंपन्यांचे प्रकल्प भारतातही आहेत. या बैठकीनंतर टेलुरियन इन्कॉर्पोरेशन आणि पेट्रोनेट एलएनजी या कंपन्यांमध्ये करार झाला. करारात म्हटल्यानुसार पेट्रोनेट कंपनी टेलुरियन कंपनीच्या ड्रिफ्टवुड एक्सपोर्ट टर्मिनल प्रकल्पात २.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. त्या बदल्यात ४० वर्षांसाठी ५ दशलक्ष मेट्रिक टन एलएनजीचे हक्क पेट्रोनेटला मिळणार आहेत. ३१ मार्च २०२० रोजी त्यांच्यात व्यवहाराचा करार होईल.

न्या. ताहिलरामानी यांचा राजीनामा मंजूर

मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश श्रीमती विजया ताहिलरामानी यांचा राजीनामा स्वीकारण्यात आल्याची माहिती सरकारी अधिसूचनेत देण्यात आली आहे. ६ सप्टेंबरपासून त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला असून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने त्यांची मेघालय उच्च न्यायालयात केलेली बदली रद्द करण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्यांनी मुख्य न्यायाधीश पदाचा राजीनामा दिला.

मद्रास उच्च न्यायालयाच्या हंगामी मुख्य न्यायाधीशपदी आता व्ही. कोठारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मद्रास उच्च न्यायालयातून ताहिलरामानी यांच्या केलेल्या बदलीमुळे चेन्नई व महाराष्ट्रात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात वकिलांकडून निदर्शने करण्यात आली होती. ताहिलरामानी यांना गेल्या वर्षी ८ ऑगस्टला बढती देऊ न मद्रास उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश नेमण्यात आले होते.

६ जून २००१ रोजी ताहिलरामानी यांना मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नेमण्यात आले होते. त्या २ ऑक्टोबर २०२० रोजी निवृत्त होणार होत्या. न्या. शरद बोबडे, न्या. एन.व्ही.रामण्णा, न्या.अरुण मिश्रा व न्या. आर.एफ नरीमन यांच्या न्यायवृंदाने ताहिलरामानी यांची बदली मेघालय उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीशपदी करून त्यांच्या जागी मद्रास उच्च न्यायालयात मेघालयचे सरन्यायाधीश ए.के.मित्तल यांची नेमणूक करण्याची शिफारस केली होती.

भारताचे माजी सलामीवीर माधव आपटे यांचे निधन

माजी कसोटीपटू आणि भारताचे माजी सलामीवीर फलंदाज माधव आपटे यांचे सोमवारी पहाटे सहा वाजता निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. भारताकडून सात कसोटी सामने खेळणाऱ्या माधव आपटे यांनी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

माधव आपटे यांनी मुंबई संघातून पदार्पण करत रणजी सामन्यात सौराष्ट्रविरूद्ध शतक ठोकलं होत. त्यानंतर १९५२-५३ या काळात त्यांनी सात कसोटी सामन्यात भारताच प्रतिनिधीत्व केलं होतं. त्यावेळी पाकिस्तानविरूद्ध झालेल्या दोन कसोटी सामन्यासाठी माधव आपटे यांची भारतीय संघात निवड झाली.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळताना त्यांनी ६७ सामन्यात ३३३६ धावा केल्या आहेत. यात सहा शतक त्यांनी झळकावली होती. क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि मुंबईचे नगरपाल या दोन्ही पदावर त्यांनी काम केले होते. माधव आपटे यांनी ‘अ‍ॅझ लक वुड हॅव इट’ हे आत्मचरित्र लिहिले. या पुस्तकात “निवड समितीचे लाला अमरनाथ यांनी आपल्या वडिलांना दिल्लीतील कोहिनूर मिलच्या व्यवसायात भागीदार करून घेण्याची मागणी केली होती

डिसेंबर २०२१ मध्ये भारत अवकाशात माणूस पाठवणार

भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोला चांद्रयान-२ च्या लँडर बरोबर संपर्क प्रस्थापित करता आला नाही. चंद्रावर रात्र सुरु झाल्यामुळे आता हा संपर्क कधीच होऊ शकत नाही. लँडर आणि त्यामध्ये असलेल्या रोव्हरचे आयुष्य १४ दिवसांचे होते. ७ सप्टेंबरला इस्रोने चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा केलेला प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. दरम्यान इस्रोचे अध्यक्ष सिवन यांनी भारताच्या भविष्यातील योजनांबद्दल माहिती दिली आहे.

डिसेंबर २०२० मध्ये मानवी अवकाश विमान स्पेसमध्ये पाठवण्याची योजना आहे. ही मानवरहित मोहिम असेल. जुलै २०२१ मध्ये मानवी अवकाश विमानाची दुसरी चाचणी असेल असे सिवन यांनी आयआयटी भुवनेश्वरच्या पदवीदान समारंभात सांगितले. डिसेंबर २०२१ मध्ये आपल्या स्वत:च्या रॉकेटमधून पहिला भारतीय अवकाशात पाठवण्याचे लक्ष्य आहे.

World Wrestling Championship : महाराष्ट्राच्या राहुल आवारेला कांस्यपदक

जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय मल्लांनी आतापर्यंत आपल्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली आहे. महाराष्ट्राचा मल्ल राहुल आवारेने ६१ किलो वजनी गटात अमेरिकेचा प्रतिस्पर्धी टेलर ली ग्राफवर ११-४ ने मात करत कांस्यपदकाची कमाई केली. यंदाच्या स्पर्धेतलं भारताचं हे पाचवं पदक ठरलं आहे. याआधी २०१३ साली भारतीय मल्लांनी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ३ पदकं पटककावली होती.

आतापर्यंत राहुलने आंतरराष्ट्रीय पातळीवर आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत दोन कांस्य आणि राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावलं आहे. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेतलं कांस्यपदक ही राहुलची सर्वोत्तम कामगिरी मानली जात आहे.

स्पर्धा परीक्षांचे नियमित अपडेट मिळवण्यासाठी मिशन एमपीएससीला फेसबुक आणि टेलिग्रामवर फॉलो करा.

Leave a Comment