MPSC परीक्षार्थींसाठी मोठी बातमी; राज्यसेवेसह ३ मुख्य परीक्षा पुढे ढकलल्या

Published On: सप्टेंबर 29, 2026
Follow Us

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे राज्य सेवा मुख्य परीक्षा-२०२५ मधील मूल्यांकनाबाबत अनेक विद्यार्थी, विद्यार्थी संघटना यांनी आक्षेप नोंदविले आहेत. हे आक्षेप विचारात घेऊन आयोगाने राज्य सेवा मुख्य परीक्षा-२०२५ च्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या परीक्षेची प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्यातील प्रचलित सर्व परीक्षा पद्धतींचा आढावा घेण्यासाठी राज्य शासनाने गठित केलेल्या उच्चस्तरीय समितीने राज्यभरातील परीक्षार्थी तसेच संबंधित घटकांशी विस्तृत चर्चा केली असून, विविध उत्तम कार्यपद्धतींचाही अभ्यास केला आहे. आदर्श परीक्षा पद्धतीबाबत समितीच्या शिफारशी लवकरच अपेक्षित आहेत.

या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थी, पालक, विद्यार्थी संघटना तसेच काही लोकप्रतिनिधींनी ३ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणारी राज्य सेवा मुख्य परीक्षा-२०२६ पुढे ढकलण्यात यावी, अशी निवेदने आयोगाकडे सादर केली होती.

या सर्व बाबींचा साकल्याने विचार करून आयोगाने ३ ऑक्टोबर २०२६ पासून होणारी राज्य सेवा मुख्य परीक्षा-२०२६, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा-२०२६ आणि महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा-२०२६ या तीन स्पर्धा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षांच्या सुधारित तारखांबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येणार असून, संबंधित उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now