⁠  ⁠

चालू घडामोडी – १५ जुलै २०१६

Tushar Bhambare
By Tushar Bhambare 4 Min Read
4 Min Read

देश-विदेश

मध्य प्रदेशमध्ये आता सरकारी ‘आनंद’ विभाग!
# एखाद्या राज्याची आर्थिक बाजू सावरली की त्या राज्याने प्रगती केली असा गोड गैरसमज आपल्याकडे आहे, पण राज्याची किंवा देशाची आर्थिक स्थिती सुधारली की तो देश प्रगतीच्या मार्गावर असतो ही समजूत खोडून टाकण्याचा प्रयत्न मध्य प्रदेशने केला आहे. मध्य प्रदेश सरकारने राज्यात ‘आनंद’ विभाग स्थापन करण्याची घोषणा केली आहे. शुक्रवारी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राज्यात आनंद विभागाची स्थापना केली जाणार असल्याची घोषणा केली. ‘आनंद’ विभाग असणारे मध्य प्रदेश हे भारताचे पहिले राज्य ठरणार आहे. ‘अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या जनतेच्या मुलभूत गरजा आहेत. पण याव्यतिरिक्त देखील समाजाच्या काही गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी सरकारने या विभागाची स्थापन केली’ असल्याचे शिवराजसिंह यांनी सांगितले.

जयरामची अव्वल वीसमध्ये झेप
# नुकत्याच झालेल्या अमेरिकन खुल्या ग्रां. प्रि. गोल्ड बॅडमिंटन स्पध्रेत उपान्त्य फेरी गाठणाऱ्या भारताच्या अजय जयरामने ताज्या जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत अव्वल विसांमध्ये मजल मारली आहे. जयरामने दोन स्थानांनी आगेकूच करीत विसावे स्थान गाठले असून, तिच्या खात्यावर ४३६७३ गुण जमा आहेत. याचप्रमाणे बी. साईप्रणीतने कॅनडा खुली स्पर्धा जिंकल्यानंतर क्रमवारीत सुधारणा केली होती. मात्र अमेरिकन स्पध्रेतील कामगिरीनंतर त्याची दोन स्थानांनी घसरण झाली आहे. तो आता ३५व्या स्थानावर आहे. याचप्रमाणे किदम्बी श्रीकांत, समीर वर्मा आणि एच. एस. प्रणॉय हे अनुक्रमे ११व्या, ३८व्या आणि २९व्या स्थानावर कायम आहेत. अमेरिकन स्पध्रेच्या उपान्त्यपूर्व फेरीत जयरामकडून पराभूत झालेल्या आनंद पवारने क्रमवारीत तब्बल १६स्थानांनी आगेकूच केली असून, तो ७७व्या स्थानावर आहे.

महाराष्ट्र

नळ पाणीपुरवठा योजनेत महाराष्ट्र मागे
# राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत लोकसंख्येच्या प्रमाणात नळ पाणीपुरवठा योजना राबवण्यात महाराष्ट्र शेजारच्या राज्यांच्या तुलनेत माघारला असून काही राज्यांनी शंभर टक्क्यांवर प्रगती केली असताना राज्यात मात्र हेच प्रमाण ८५ टक्क्यांवर स्थिरावले आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम हा केंद्र शासनाचा महत्वाचा कार्यक्रम असून राज्यात एप्रिल २००९ पासून राबवण्यात येत आहे. ग्रामीण भागात कायमस्वरूपी, पिण्यायोग्य आणि पुरेसे पाणी पुरवणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. राज्यात या कार्यक्रमाची अंमलबजावणी फारशी समाधानकारक नाही, हे केंद्र सरकारच्या पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालयाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता क्षेत्रात सुधारणा, तसेच विकेंद्रीकरण घडवून आणण्यात महाराष्ट्र राज्य देशात अग्रेसर असल्याचा दावा सरकारकडून करण्यात येत असला, तरी ग्रामीण भागात पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याच्या मार्गात अडथळे कायम आहेत. राज्यात २०१५-१६ या वर्षांत १४२४ गावांमध्ये पाणीपुरवठय़ाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते, त्यापैकी १४०५ गावांमध्ये उद्दिष्टपूर्ती झाली, १८७ गुणवत्ता बाधित गावांपैकी १४४ गावांमध्ये ते साध्य झाले. २०१६-१७ या चालू आर्थिक वर्षांत १६८२ गावांचे उद्दिष्ट असताना ३० जूनअखेर ५८ गावांमध्येच कामे सुरू झाली आहेत. गुणवत्ताबाधित ११४ गावांपैकी एका गावालाही हात लागलेला नाही.

क्रीडा

हरिकाची जेतेपदाला गवसणी
# भारताची ग्रँडमास्टर हरिका द्रोणावल्लीने फिडे महिला ग्रां.प्रि. विजेतेपदाला गवसणी घातली. पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळणाऱ्या हरिकाने अखेरच्या फेरीत रशियाच्या ओल्गा गिऱ्याशी बरोबरी साधली आणि कारकीर्दीतील पहिल्या वहिल्या ग्रॅण्ड प्रिक्स जेतेपदावर मोहर उमटवली. जगातील अव्वल १२ खेळाडूंचा सहभाग असलेल्या आणि राऊंड रॉबिन पद्धतीने झालेल्या या स्पध्रेत हरिकाने सर्वाधिक ७ गुण मिळवले. भारताची आणखी एक ग्रँडडमास्टर कोनेरू हम्पीच्या खात्यावरसुद्धा ७ गुण जमा होते. मात्र स्पध्रेतील उत्तम बरोबरीच्या निकालांच्या आधारे हरिकाला विजेती म्हणून घोषित करण्यात आले.

अर्थव्यवस्था

काळ्या पैशावरील कर व दंड भरण्यास मुदतवाढ
# नवी दिल्ली- “प्राप्ती जाहीर योजने‘अंतर्गत काळ्या पैशावरील कर व दंड भरण्याची मुदत केंद्र सरकारने 30 सप्टेंबर 2017 पर्यंत वाढविली असून, हा कर व दंड तीन हप्त्यांमध्ये भरता येणार आहे. प्राप्ती जाहीर योजनेतील पहिला 25 टक्‍क्‍यांचा हप्ता नोव्हेंबर 2016, दुसरा 25 टक्‍क्‍यांचा हप्ता 31 मार्च 2017 रोजी भरता येणार आहे. यानंतर उरलेली रक्कम 30 सप्टेंबर 2017 पर्यंत भरावयाची आहे, अशी माहिती अर्थ मंत्रालयाने दिली आहे. यापूर्वी कर, अधिभार आणि दंड भरण्याची मुदत यावर्षी 30 नोव्हेंबरपर्यंत होती. जाहीर करण्यात आलेल्या काळ्या पैशावरील कर, अधिभार व दंड भरण्यासाठी ही नवी पद्धत महसूल विभागाने आणली आहे. करदात्याला एकावेळी ही रक्कम भरण्यास अडचणी येत असल्याने तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम भरण्याची सुविधा देण्यात आली आहे.

TAGGED:
Share This Article