⁠  ⁠

Current Affairs 27 March 2019

Chetan Patil
By Chetan Patil 4 Min Read
4 Min Read

क्षेपणास्त्रभेदी यंत्रणेमध्ये अमेरिकेचे पुढे पाऊल

  • अमेरिकेने क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा आणखी सुसज्ज करताना, निर्धारित लक्ष्य क्षेपणास्त्र एकाच वेळी दोन क्षेपणास्त्रांच्या मदतीने भेदले. क्षेपणास्त्र हल्ल्याला रोखताना अधिक अचूकतेने लक्ष्यभेद करण्यासाठी ही यंत्रणा विकसित करण्यात आली असून, यामध्ये पहिल्यांदाच एका क्षेपणास्त्राला लक्ष्य करण्यासाठी दोन ‘इंटरसेप्टर’ वापरण्यात आले आहेत. ही चाचणी यशस्वी झाल्याचे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
  • या चाचणीमध्ये मार्शल बेटांवरून चाचणीमधील क्षेपणास्त्र डागण्यात आले होते, तर दक्षिण कॅलिफोर्नियातून ही क्षेपणास्त्रभेदी क्षेपणास्त्रे डागण्यात आली. ‘हल्ल्या’साठी येणारे क्षेपणास्त्र वातावरणाच्या कक्षेमध्ये येताच, पहिल्या क्षेपणास्त्राने ते नष्ट केले. तर, दुसऱ्या क्षेपणास्त्रभेदी क्षेपणास्त्राने उर्वरित भागालाही लक्ष्य केले. ‘ही यंत्रणा अतिशय अचूकपणे काम करत असून, हल्ल्याचा धोका वेळीच नष्ट करण्यासाठी यंत्रणा अधिक मजबूत झाली आहे,’ असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रसिद्ध मल्याळम लेखिका, कवयित्री अशिता यांचे कर्करोगाने निधन

  • प्रसिद्ध मल्याळम लेखिका आणि कवयित्री अशिता यांचे बुधवारी (दि.२७) पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले, त्या ६३ वर्षांच्या होत्या. कर्करोगाने ग्रस्त असल्याने त्यांच्यावर त्रिशूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते, येथेच त्यांनी प्राणज्योत मालवली.
  • अशिता यांचा जन्म ५ एप्रिल १९५६ रोजी त्रिशूरमध्ये झाला होता. उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या लेखनाच्या क्षेत्रात सक्रिय झाल्या. आजवर त्यांची २० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. यामध्ये विस्मया छिन्नांगल, अपोर्ना विरामंगल, अष्टाधायुदे कथकाल, मज्झमंगल ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.
  • मल्याळम भाषेतील लेखनात विशेष कामगिरी केल्याबद्दल अशिता यांना अनेक पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे. यामध्ये प्रतिष्ठीत एडसेरी अवॉर्ड (१९८६) आणि ललितांबिका अंतर्जनम पुरस्कार (१९९४) यांचा समावेश आहे.

जागतिक रंगभूमी दिनाचे महत्व

  • 27 मार्च हा दिवस दरवर्षी ‘जागतिक रंगभूमी दिन‘ म्हणून साजरा केला जातो. 1961 मध्ये ‘युनेस्को’च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिटय़ूटने या दिवसाची सुरुवात केली होती.
  • पहिला जागतिक रंगभूमी दिन 1962 मध्ये साजरा झाला. त्यानंतर दरवर्षी या दिवशी विविध कार्यक्रम व उपक्रमांद्वारे जागतिक रंगभूमी दिन उत्साहाने साजरा होतो.
  • तर यानिमित्ताने जगभरातील नाट्य जगतातील महत्त्वाची एक व्यक्ती संदेश देते. हा युनेस्कोच्या जागतिक रंगभूमी दिनाचा महत्त्वाचा भाग आहे. 1962 साली ज्यो कॉक्चू यांना संदेश देण्याचा पहिला मान मिळाला होता.
  • व्यक्ती आणि त्याची संवाद साधण्याची कला यातून सामुदायिक कलाविष्काराला इंग्रजीत ‘थिएटर’ आणि मराठीत आपण ‘रंगभूमी’ हा शब्द त्याला वापरतो. रंगभूमी, नाट्यसंहिता, नाट्यदिग्दर्शक, रंगभूषा, वेषभूषा, रंगमंदिर, रंगमंच या सर्व गोष्टी रंगभूमीशी निगडित आहेत. पूर्वी आजच्यासारखे रंगमंच नव्हते तेव्हा एका मैदानात रंगमंदिर उभारले जात असे. पुढे हळूहळू आजच्यासारखी बंदिस्त रंगमंचाची संकल्पना अस्तित्वात आली.

यु.पी.एस. मदान यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती

  • राज्याच्या मुख्य सचिवपदी अखेर यु.पी.एस मदान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एमएमआरडीए, महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण अशा विविध ठिकाणी मदान यांनी काम केले आहे.
  • दिनेशकुमार जैन यांच्या दिल्लीतील नियुक्तीमुळे रिक्त झालेल्या मुख्य सचिवपदासाठी वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा सुरू होती. दिनेशकुमार जैन यांची देशाच्या लोकपालमध्ये बिगर न्यायिक सदस्य म्हणून निवड झाली होती.
  • सेवाज्येष्ठतेनुसार सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मेधा गाडगीळ, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव यु.पी.एस मदान, केंद्रात माजी सैनिक कल्याण खात्याच्या सचिव संजीवनी कुट्टी, केंद्रीय महसूल सचिव अजय भुषण पांडे, मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता, गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय कुमार यांचा क्रम लागतो. यापैकी गाडगीळ यांना यापूर्वीच मुख्यसचिवपद नाकारण्यात आले.
  • पांडे व कुट्टी हे दोन्ही अधिकारी केंद्रात सचिवपदावर असून राज्यात येण्यास उत्सुक नव्हते. त्यामुळे मदान, मेहता व संजय कुमार यांच्यातच चुरस होती.
  • मदान ऑक्टोबरमध्ये तर मेहता सप्टेंबरमध्ये सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे मुख्यसचिवपदी मुख्यमंत्री कोणाची वर्णी लावतात याकडे प्रशासनाचे लक्ष लागले होते. अखेर मुख्य सचिवपदी यु.पी.एस मदान यांची निवड करण्यात आली आहे. यु.पी.एस मदान 1983 च्या बॅचमधील आयएएस अधिकारी आहेत.
Share This Article