⁠  ⁠

“एमपीएससी’ची सप्टेंबरमध्ये संयुक्‍त पूर्व परीक्षा?

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) कडून ‘संयुक्त गट ब ‘ परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबणीवर पडली आहे. राज्यातील बहुताश जिल्ह्यात अजूनही कोरोनाची स्थिती सुधारली नसल्याने आता ही परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. तरीही, सध्याचा लॉकडाउन संपल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या परवानगीने 18 जुलैला परीक्षा होऊ शकते, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, जून महिन्यापासून राज्यात पावसाला सुरवात होते. जुलै-ऑगस्टमध्ये मुंबई, रत्नागिरीसह अन्य जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. त्यामुळे या काळात परीक्षा घेणे अशक्‍य आहे. तर ऑक्‍टोबरमध्ये यूपीएससीच्या परीक्षा होणार आहेत. त्यामुळे 18 जुलैपर्यंत परीक्षा न झाल्यास संयुक्‍त पूर्व परीक्षा सप्टेंबरमध्येच होईल, असे आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, राज्यात काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाची स्थिती सुधारू लागली आहे. मात्र काही जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती अजूनही बिकट आहे. त्यात आता आयोगाने जिल्हानिहाय कोरोना परिस्थितीचा आढावा घ्यायला सुरवात केली आहे. लॉकडाउन संपल्यानंतर आयोगाकडून परीक्षेसंदर्भात आपत्ती व्यवस्थापन विभागाला विचारणा केली जाईल. त्यानंतर परीक्षेसाठी पोषक वातावरण असल्यास जुलैच्या मध्यावधीत परीक्षा घेण्याचे नियोजन होईल. परीक्षेचे वेळापत्रक परीक्षेच्या एक महिना अगोदर जाहीर करावे लागते, असेही आयोगातील सूत्रांनी या वेळी सांगितले.

पोलिस उपअधीक्षक, उपजिल्हाधिकाऱ्यांसह जवळपास दोन हजार उमेदवार एमपीएससीच्या सर्वच परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊन नियुक्‍तीच्या प्रतीक्षेत आहेत. मराठा आरक्षणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात गेल्याने त्या उमेदवारांच्या नियुक्‍त्या रखडल्या होत्या. आता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल होऊनही त्या उमेदवारांच्या नियुक्‍त्यांबाबत राज्य सरकारने तोंडावर बोट ठेवले आहे. उमेदवारांकडून आयोगाला दररोज नियुक्‍तीसंदर्भात विचारणा केली जात असल्याने त्यांच्याबाबतीत काय निर्णय घ्यायचा, याचे मार्गदर्शन करावे, असे पत्र आयोगाने सामान्य प्रशासन विभागाला पाठविले आहे. परंतु, अजून त्यावर निर्णय झाला नसल्याने आणखी काही दिवस त्या उमेदवारांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Share This Article