⁠  ⁠

चालू घडामोडी : २६ ऑक्टोबर २०१९

Rajat Bhole
By Rajat Bhole 3 Min Read
3 Min Read

Current Affairs 26 October 2019

सुलभ व्यवसाय यादीत भारताचे स्थान उंचावले

– सुलभ व्यवसाय वातावरणाबाबत भारताचे स्थान जागतिक बँकेच्या यादीत १४ने उंचावत ७७ वरून ६३ पर्यंत पोहोचले आहे. नादारी आणि दिवाळखोरी संहिता, अप्रत्यक्ष करप्रणालीसारख्या आर्थिक सुधारणांमुळे देशाचे स्थान याबाबत सलग तिसऱ्यांदा उंचावले असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

– भारताप्रमाणे यादीत चीन (३१), सौदी अरेबिया, जॉर्डन, कुवैत, ताजिकिस्तान, पाकिस्तान (१०८ वे स्थान) यांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यूझीलंड यंदाही अव्वल स्थानीच आहे. तर सिंगापूर, हाँगकाँग, कोरिया, अमेरिका हे देश पहिल्या १० मध्ये राहिले आहेत. रिझव्‍‌र्ह बँक, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आदींमार्फत भारताच्या विकास दराचा चालू वित्त वर्षांसाठीचा अंदाज खाली आणला जात असतानाच गुरुवारी जाहीर झालेल्या भारताच्या सुलभ व्यवसाय वाढत्या क्रमवारीचे उद्योग क्षेत्राने स्वागत केले आहे.

– आर्थिक सुधारणांचा परिणाम नोंदविल्याचे जागतिक बँकेचे प्रशस्तिपत्र

कोकण किनारपट्टीवर ‘क्यार’ चक्रीवादळ धडकणार

– राज्यातील मान्सून जरी परतल्यात जमा असला तरी देखील कोकणाला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण आणि गोवा किनारपट्टीला ‘क्यार’ या चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टी भागातील नागरिकांना ऐन दिवाळीत नैसर्गिक संकटाला तोंड द्यावे लागणार असल्याचे दिसत आहे.

– आगामी दोन दिवसात ‘क्यार’ हे चक्रीवादळ कोकणासह गोवा किनारपट्टीवर धडकणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. शिवाय या पार्श्वभूमीवर येथील रहिवाशांना व प्रशासनास सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे.

U-19 विश्वचषकाची घोषणा, भारताचा अ गटात समावेश

– २०२० वर्षाच्या सुरुवातीलाच क्रिकेट प्रेमींना विश्वचषकाचा थरार अनुभवायला मिळणार आहे. आयसीसीने १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेची घोषणा केली असून, १७ जानेवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान दक्षिण आफ्रिकेत ही स्पर्धा रंगणार आहे. गतविजेत्या भारताचा अ गटात समावेश करण्यात आला आहे.

‘तमन्ना’: CBSE आणि NCERT यांची ऑनलाइन योग्यता चाचणी परीक्षा

– विद्यार्थ्यांना योग्य कार्यक्षेत्राची निवड करण्यास मदत करण्याच्या उद्देशाने, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT) या संस्थांनी ‘तमन्ना’ (ट्राय अँड मेझर अ‍ॅप्टीट्यूड अँड नॅचरल अॅबिलिटी) या नावाने एक ऑनलाइन योग्यता चाचणी परीक्षा सादर केली आहे.

– या परीक्षेचा हेतू इयत्ता 9 वी आणि 10 वीच्या विद्यार्थ्यांना विषयांची अधिक योग्य पद्धतीने निवड करण्यात मदत करणे आणि अखेरीस त्यांना इयत्ता 11 वी व 12 वी मधल्या विषयांची निवड करताना माहिती देऊन निर्णय घेण्यात मदत करणे आहे.

चालू घडामोडींच्या नियमित अपडेटसाठी तुम्ही Mission MPSC ला फेसबुक, टेलिग्राम आणि इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता.

Share This Article