⁠  ⁠

Current Affairs 12 February 2018

Saurabh Puranik
By Saurabh Puranik 6 Min Read
6 Min Read

1) ‘स्मार्ट सिटी’साठी ९९४० कोटी रुपये

शहरांच्या अत्याधुनिकीकरणातून नागरिकांना अनेक सुविधा देण्याच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेसाठी केंद्राने राज्य सरकारांना ९९४० कोटी रुपये दिले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील पुणे, नाशिकसह ८ शहरांचा समावेश आहे. त्यासाठी महाराष्ट्राला १३७८ कोटी रुपये देण्यात आले आहेत. याशिवाय मध्य प्रदेशातील सात शहरांना या स्मार्ट सिटी योजनेखाली ९८४ कोटी रुपये देण्यात आले आहेत. गृहनिर्माण मंत्रालयाने आतापर्यंत केंद्र सरकारच्या सहाय्याने ९९ शहरांना स्मार्ट सिटी योजनेखाली आणले आहे. या शहरांना अत्याधुनिक सुविधांची शहरे बनवण्यासाठी मोदी सरकारची २.०३ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना प्रस्तावित आहे. मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार स्मार्ट सिटीमध्ये सर्वात जास्त शहरे तामिळनाडू राज्यातील आहेत. तेथे ११ शहरे असून आतापर्यंत ८४८ कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे सात शहरे कर्नाटकात असून त्यांना ८३६ कोटी रुपये तर राजस्थानला ७८४ कोटी रुपये देण्यात आले आहेत. योजनेमध्ये आंध्र प्रदेशातील चार शहरांना या स्मार्ट सिटी योजनेसाठी ५८८ कोटी रुपये मिळाले आहेत. उत्तर प्रदेशात १० शहरे असून त्यांना ५४७ कोटी रुपये, गुजरातमध्ये ६ शहरे असून त्यांना ५०९ कोटी रुपये केंद्र सरकारने आतापर्यंत दिले आहेत. पश्चिम बंगालमध्ये केवळ एकच शहर असून त्यांना सर्वात कमी रक्कम ८ कोटी रुपये देण्यात आले आहेत. मे २०१६ मध्ये न्यू टाऊन कोलकाता या शहराला स्मार्ट सिटी योजनेमध्ये अंतर्भूत केले गेले.

@MMCurrentAffairs स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा.

2) अबुधाबीत पहिल्या हिंदू मंदिराची कोनशिला

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी संयुक्त अरब अमिरातीची राजधानी अबुधाबीत उभारल्या जाणाऱ्या पहिल्या हिंदू मंदिराची कोनशिला दुबईतून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ठेवली. हे मंदिर भारताच्या ओळखीचे माध्यम बनेल, असे मोदी याप्रसंगी म्हणाले. या मंदिराच्या निर्मितीसाठी त्यांनी अबुधाबीचे युवराज मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांचे १२५ कोटी भारतीयांच्या वतीने आभारही मानले. येथील शासकांनी भारताविषयी अत्यंत आदर दाखविला आहे. त्यांना भारतीय संस्कृतीच्या इतिहासावर गर्व राहिला आहे. आता ही आपली जबाबदारी आहे की काही चूक होऊ नये, असे मोदी दुबईतील ओपेरा हाऊसमधील भारतीयांना केलेल्या संबोधनादरम्यान म्हणाले. हे मंदिर केवळ वास्तुकला व भव्यतेच्या दृष्टिकोनातून अद्भुत असेल, तसेच हे जगभरातील लोकांना वसुधैव कुटुंबकमचा संदेश देईल, असेही मोदी म्हणाले. ‘अबुधाबी-दुबई महामार्गावरील बीएपीएस स्वामीनारायण मंदिराच्या कोनशिला ठेवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साक्षीदार बनले.

पंतप्रधान नरेंद्र मोदीनी दिला सहा ‘आर’चा मंत्र

दुबईतील जागतिक सरकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहासूत्री मंत्रही दिला. रिड्युस, रियुज, रिसायकल, रिकव्हर, रिडिझाइन व रिमॅन्युफॅक्चर या सहा ‘आर’चा अवलंब केल्यास आपल्याला रिजॉईस म्हणजेच आनंद मिळेल, असेही मोदी म्हणाले. तंत्रज्ञानाने सामान्य माणसाला सामर्थ्यशाली बनवले आहे. यामुळे ‘किमान सरकार, कमाल शासन’ या कल्पनेला प्रोत्साहन मिळाले. ई-गव्हर्नन्समधील ई म्हणजे इफेक्टिव्ह (प्रभावी), इफिशिएन्ट (कार्यक्षम), इझी (सोपे), एम्पावर (सक्षम) आणि इक्विटेबल (न्याय्य) असेही ते या वेळी म्हणाले. तंत्रज्ञानाने विचारांची गती बदलत आहे. आता गरज ही शोधाची जननी राहिली नाही, तर शोधातून नव्या गरजा निर्माण होत आहेत, असेही मोदी म्हणाले. रिड्युस म्हणजेच वापर कमी करणे, रियुज म्हणजे पुन्हा वापरणे, रिसायकल म्हणजे पुनर्चक्र, रिकव्हर म्हणजे पुन्हा प्राप्त करणे, रिडिझाइन म्हणजे पुन्हा डिझाइन करणे व रिमॅन्युफॅक्चर म्हणजे पुन्हा तयार करणे या सहा ‘आर’चा अवलंब केल्यास आपल्याला रिजॉईस म्हणजेच आनंद मिळेल, असेही ते म्हणाले.

3) एप्रिलपासून देशात इंडिया पोस्ट बँकेची पेमेंट्स सेवा

या वर्षातच भारतीय पोस्ट पेमेंट्स बँक (आयपीपीबी) देशभरात आपले काम सुरू करणार असल्याची माहिती भारतीय टपाल विभागाने एका निवेदनाद्वारे दिली आहे. यात म्हटले आहे की, आयपीपीबीच्या विस्तार कार्यक्रम चालू असून एप्रिल २०१८ पासून संपूर्ण देशात त्याचे नेटवर्क काम करणे सुरू करील. देशातील सर्वच्या सर्व म्हणजे १.५५ लाख टपाल कार्यालयांमध्ये या बँक सेवेचा वापर करता येऊ शकेल. टपाल कार्यालयांना आयपीपीबीच्या ६५० शांखांशी संपर्क जाळे संपर्कित केले जाणार असून एकदा का प्रस्तावित विस्ताराचे हे काम पूर्ण झाले की, त्यानंतर आयपीपीबी देशाच्या आर्थिक सेवासुविधांची सेवा उपलब्ध करणारे सर्वात मोठे जाळे असेल. पोस्टमन व ग्रामीण टपाल सेवकांच्या मदतीने ही वित्तीय सेवा म्हणूनही लोकांच्या घरांपर्यंत पोहोचेल. डिजिटल सेवाही लोकांच्या घरांपर्यंत जाऊ शकेल, अशी क्षमता या कामात असणार आहे. अतिग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागांमधील लोकांना या सेवेचा लाभ मिळू शकणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने २०१५ मध्ये ११ उद्योगांना पेमेंट बँक चालू करण्याची परवानगी दिली होती. त्यामध्ये भारतीय टपाल विभागालाही ही सेवा सुरू करण्यासाठी परवाना दिला होता. पेमेंट बँक ग्राहक, छोटे व्यावसायिक यांच्याकडून एक लाख रुपयांपर्यंत प्रति खात्यामागे ठेव स्वीकारू शकते. छोटे व्यावसायिकही यात ठेव जमा करू शकतात. मात्र, अन्य बँकांसारखी कर्ज मात्र ग्राहकांना देऊ शकणार नाहीत.

4) स्मृती मंधाना बाटाची ब्रँड ॲम्बेसेडर

फूटवेअर ब्रँड बाटाने महिला क्रिकेट टीमची ओपनिंग बॅट्समन स्मृती मंधानासोबत आपल्या सहयोगाची घोषणा केली आहे. सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असलेली ओडीआय स्क्वाडची उपकर्णधार स्मृती ही सर्व वयोगटाच्या भारतीयांचा पसंतीचा स्पोर्ट्स वेअर ब्रँड असलेल्या पॉवरचा नवीन चेहरा असणार आहे.

5) पाकिस्तानातील मानवाधिकार कार्यकर्त्या आसमा जहाँगीर यांचे निधन

पाकिस्तानातील प्रसिद्ध मानवाधिकार वकील व सामाजिक कार्यकर्त्या आसमा जहाँगीर यांचे रविवारी हृदयविकाराच्या धक्क्याने लाहोरमध्ये निधन झाले. त्या ६६ वर्षांच्या होत्या. हृदयविकाराच्या धक्क्यानंतर सकाळी त्यांना लाहोरमधील हमीद लतीफ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे वरिष्ठ वकील अदील राजा म्हणाले. पाकिस्तानातील वकील तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी जहाँगीर यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या कन्या मुनिझे जहाँगीर या दूरचित्रवाहिनीवर निवेदिका आहेत. पाकिस्तान मानवाधिकार आयोगाच्या सहसंस्थापिका असलेल्या आसमा या आयोगाच्या अध्यक्षाही राहिल्या आहेत. सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनच्याही त्या अध्यक्षा राहिल्या आहेत.

स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी जानेवारी २०१८ मासिक मोफत डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Share This Article