⁠  ⁠

Current Affairs 28 January 2018

Saurabh Puranik
By Saurabh Puranik 4 Min Read
4 Min Read

1) अ‍ॅसिड हल्लाग्रस्तांसह दिव्यांगाना केंद्राचे चार टक्के आरक्षण

आत्मकेंद्रीपणा (आॅटिझम), मनोरुग्ण, बौद्धिक दुर्बलता आणि अ‍ॅसिड हल्ल्याने बाधित झालेल्या व्यक्तींना केंद्र सरकारच्या नोक-यांमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याचे अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले आहे. ‘अ’,‘ब’ आणि ‘क’ श्रेणीतील थेट भरतीच्या पदांपैकी चार टक्के जागा विवक्षित प्रमाणात अपंगत्व (बेंचमार्क डिसेबिलिटी)असलेल्या दिव्यांगांसाठी राखून ठेवल्या जाणार आहेत. ठराविक प्रकारच्या ४० टक्के किंवा त्याहून अधिक अपंगत्वास ‘बेंचमार्क डिसेबिलिटी’ म्हटले जाते.
केंद्र सरकारच्या सर्व खात्यांमध्ये अंध व अधूदृष्टी, कर्णबधीर, सेलेब्रल पाल्सीसह अवयव व्यंगता असलेले, स्नायूंचा शक्तीपात झालेले, खुजेपणाने उंची खुंटलेले आणि अ‍ॅसिडहल्ल्याने बाधीत झालेले अशा लोकांसाठी प्रत्येकी एक टक्का जागा राखून ठेवण्यात येणार आहेत. तसेच आॅटिझम, बौद्धिक दुर्बलता, शिक्षणात मंद असलेले व मनोरुग्ण यांच्यासाठीही हे एक टक्का आरक्षण लागू असेल. याआधी सन २००५ मध्ये काढलेल्या परिपत्रकानुसार दिव्यांगांसाठी तीन टक्के आरक्षण होते. २०१६ साली नवा दिव्यांग
हक्क कायदा संमत झाल्यानंतर हे आरक्षण एक टक्क्याने वाढवण्यात आले आहे.

2) प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राचा शिवराज्याभिषेक सोहळा चित्ररथ ठरला देशात प्रथम

राजपथावर झालेल्या यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राने बाजी मारली आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागाने प्रथमच तीनही प्रकारांत प्रथम क्रमांक पटकावित सर्वोत्तम कामगिरी नोंदविली आहे. छत्रपती शिवरायांची कीर्ती सांगणा-या चित्ररथाने प्रथम पुरस्कार मिळविला आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या विजयी पथकाला सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्रक देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी सांस्कृतिक कार्य संचलनालयाचे संचालक संजय पाटील तसेच चित्ररथाची संकल्पना साकारणारे प्रा. नरेंद्र विचारे, कला दिग्दर्शक नितीन देसाई उपस्थित होते. यंदा प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात राजपथावर छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचा सोहळा अवतरला होता. छत्रपती शिवरायांची कीर्ती सांगणारा चित्ररथ राजपथावर फिरला आणि महाराष्ट्राचे हे वैभव जगाला दिसले. महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक प्राप्त करून आपला दबदबा कायम राखला आहे. प्रा. नरेंद्र विचारे यांच्या संकल्पनेतून आणि कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या दिग्दर्शनाखाली महाराष्ट्राचा चित्ररथ साकारला आहे. यावेळी संचलनात राजपथावर 14 राज्यांसह केंद्र सरकारच्या 7 खात्यांचे आणि भारत-आशियान राष्ट्रांचे संबंध दाखवणारे 2 चित्ररथ असे एकूण 23चित्ररथ सादर झाले होते. चित्ररथाच्या सुरुवातीला किल्ल्याची प्रतिकृती होती, त्यावर मधोमध शिवरायांची अश्वारुढ प्रतिकृती दर्शवण्यात आलेली होती. तर मध्यभागी रायगडाची प्रतिकृती आणि मेघडंबरीत सिंहासनावर छत्रपती शिवराय विराजमान झालेले दाखवले गेले होते. त्याच प्रमाणे महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे अध्यक्ष असलेल्या दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र, नागपूर विभागाकडून सादर करण्यात आलेल्या बरेदी लोक नृत्य या नृत्यास प्रथम क्रमांक मिळाला आहे. तसेच प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय रंग शाळेत झालेल्या आंतरराज्यीय नृत्य स्पर्धेत महाराष्ट्राचा पथकाने प्रथम क्रमांक मिळवित महाराष्ट्राचा मान राखला आहे.

3) ऑस्कर नामांकनांच्या यादीत ‘शेप ऑफ वॉटर’ची बाजी

जगभरातील अनेक सिनेरसिकांचे लक्ष लागलेल्या ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकने जाहीर करण्यात आली आहेत. या जाहीर केलेल्या नामांकनांच्या यादीत दिग्दर्शक गिआर्मो डेल टोरो यांच्या ‘शेप ऑफ वॉटर’ चित्रपटाला यंदा ऑस्करची सर्वाधिक 13 नामांकने मिळाली आहेत. या वर्षीच्या 90व्या अकादमी अवॉर्डससाठी एकूण नऊ चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. येत्या 4 मार्च रोजी लॉस अँजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये हा पुरस्कार सोहळा रंगणार असून, या सोहळ्याचे सूत्रसंचालन जिम्मी किम्मेल करणार असल्याचे समजते
‘शेप ऑफ वॉटर’ सोबत ख्रिस्तोफर नोलन यांचा युद्धपट ‘डंकर्क’, गोल्डन ग्लोबमध्ये महत्त्वाचे पुरस्कार पटकावलेला ‘थ्री बिलबोर्ड आऊटसाइड एबिंग, मिझूरी’, स्टीवन स्पीलबर्ग दिग्दर्शित ‘द पोस्ट’ यासोबत ‘फॅण्टम थ्रेड’, ‘डार्केस्ट अवर’, ‘द पोस्ट’, ‘गेट आऊट’, ‘कॉल मी बाय युवर नेम’ , ‘लेडी बर्ड’ हे चित्रपटही यंदा ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीत आहेत. विशेष म्हणजे, ‘द पोस्ट’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून मेरिल स्ट्रीप यांच्या भूमिकेला नामांकन मिळाले असून ऑस्करसाठी हे त्यांचे एकविसावे नामांकन आहे.

MSPC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्रामवर फॉलो करा.

Share This Article